म्हापसा येथील दुकानावर ईडीची धाड

२ ते ३ कोटी रुपयांच्या अवैध परकीय चलन व्यवहाराचा पर्दाफाश

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
29th September, 05:38 pm
म्हापसा येथील दुकानावर ईडीची धाड

पणजी : म्हापसा येथील बाजारपेठेत कार्यरत असलेल्या एका दुकानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या धाडीत तब्बल २ ते ३ कोटी रुपयांच्या अवैध परकीय चलन व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. २६ सप्टेंबर रोजी ‘लोजा शामू’ नावाच्या दुकानावर टाकलेल्या या धाडीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, परकीय चलन, तसेच संशयास्पद नोंदी व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई गोवा विमानतळ कस्टम्सकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीनंतर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी कस्टम्स अधिकाऱ्यांनी सुमारे ३५,००० अमेरिकी डॉलर जप्त केले होते. चौकशीत या रकमेचा संबंध म्हापसा बाजारातील एका दुकानाशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ईडीने तत्काळ तपास सुरू केला.

शोध मोहिमेदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी दुकानातून अंदाजे ३ लाख रुपयांचे परकीय चलन, सुमारे १३ लाख रुपयांचे भारतीय चलन, अवैध परकीय चलन व्यवहारांशी संबंधित चिठ्ठ्या व नोंदी, २ मोबाईल फोन जप्त केले. मोबाईल फोनमधील चॅट्स व संवाद यात दुकान मालकाच्या बेकायदेशीर व्यवहारांचे ठोस पुरावे आढळले आहेत. प्राथमिक तपासात उघड झाले की, जप्त केलेला मुद्देमाल आणि आढळलेल्या नोंदी या सर्व ‘फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट’ (फेमा) च्या तरतुदींचे स्पष्ट उल्लंघन करतात. 

आणखी काहीजणांचा सहभाग शक्य

या प्रकरणामागे केवळ दुकान मालकच नव्हे, तर इतर व्यक्ती आणि संस्थांचा मोठा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ईडीने जप्त नोंदी, चिठ्ठ्या, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल पुरावे यांची सखोल तपासणी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत या रॅकेटचे इतर धागेदोरे उघड होऊन आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे.

दुकानात आढळले...

* अंदाजे ३ लाख रुपयांचे परकीय चलन

* सुमारे १३ लाख रुपयांचे भारतीय चलन

* अवैध परकीय चलन व्यवहारांशी संबंधित चिठ्ठ्या व नोंदी

* २ मोबाईल फोन


हेही वाचा