सासष्टी : कोलवा पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, संशयितांना बजावल्या नोटीसा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th September, 03:48 pm
सासष्टी : कोलवा पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, संशयितांना बजावल्या नोटीसा

मडगाव: धिरयोप्रकरणी कोलवा पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. कॉल रेकॉर्डसची पडताळणी केल्यानंतर आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. बैल आणि रेडे असलेल्यांसह कॉल रेकॉर्डसमधील माहितीच्या आधारे संशयितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, संशयित मिनिनो फर्नांडिस, रुई मिनेझिस आणि राकेश यांचा शोध सुरू आहे.

मागेच धिरयोच्या वेळी रेड्याच्या हल्ल्यात राजेश निस्तानी (४२, रा. गिर्दोली) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत संशयित सांतान कार्दोझो (४३, रा. कुडतरी), ज्योकिम परेरा (४८, रा. माजोर्डा) आणि जुझे कुलासो ऊर्फ पेले (५४, रा. माजोर्डा) यांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

माजोर्डा येथील पॉवरस्टेशनजवळ २२ तारखेला 'चांदो' आणि 'गॉडफादर' या रेड्यांमध्ये धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उधळलेल्या 'चांदो' या रेड्याने राजेश निस्तानी याच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या राजेशचा मृत्यू झाला. कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संशयित रुई मिनेझिस, राकेश आणि मिनिनो फर्नांडिस फरार असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

कोलवा पोलिसांनी तपासादरम्यान संशयितांचे कॉल रेकॉर्डस तपासले असून, त्यातील माहितीच्या आधारे आणखी काही संशयितांना या प्रकरणी नोटिसा जारी केल्या आहेत. याशिवाय, कोलवा परिसरातील ज्यांच्याकडे बैल आणि रेडे आहेत, त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 


हेही वाचा