मुख्यमंत्री डॉ. सावंत : डिचोलीत रोजगार मेळावा
डिचोलीत रोजगार भरती मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, एस. गावकर, हरीश मेलवानी व इतर.
डिचोली : गोव्यातील तरुणांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून खासगी क्षेत्रातील उपलब्ध संधींचा फायदा घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. नोकऱ्यांसाठी राजकीय नेत्यांच्या दारात जाण्याने काहीच होणार नाही, असा थेट सल्लाही त्यांनी दिला.
कौशल्य विकास तसेच डिचोली सत्तरी आयटीआय यांच्या विद्यमाने सरकारी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या विशेष रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये, आमदार प्रेमेंद्र शेट, उद्योगपती हरीश मेलवानी, तसेच संचालक एस. एस. गावकर आदी उपस्थित होते.
राज्य सरकार नियमित रोजगार मेळावे आयोजित करत असूनही, त्या ठिकाणी युवकांची उपस्थिती अल्प असते. रोजगार मेळाव्यात त्वरित नोकरी मिळण्याची संधी असूनही युवकांच्या अनुपस्थितीमुळे ते रोजगारापासून वंचित राहतात आणि उलट सरकारवर खापर ठेवतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डिचोलीत आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यात ४६ कंपन्यांनी सहभाग घेतला असून ३५२ जागा नोकरीसाठी उपलब्ध आहेत, मात्र या मेळाव्यात केवळ शंभर जणांनीच उपस्थिती लावली आहे, हे चित्र योग्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
युवकांनी कौशल्य विकसित करताना सुरुवातीला मिळेल ती नोकरी पत्करून सरकारी व इतर नोकरीसाठी प्रयत्न करावेत. यापुढे सरकारी नोकरीसाठी किमान अनुभव असलेल्यांनाच नोकरीत समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी युवकांना नवीन शिक्षण घेण्याचे आणि कौशल्य विकसित करून अनेक क्षेत्रांतील संधींचे सोने करण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवकांनी छोटे-मोठे उद्योग उभारावेत आणि इतरांना रोजगार देण्याची दृष्टी ठेवावी, असे ते म्हणाले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही, सरकारी नोकऱ्या प्रत्येकाला मिळणे शक्य नाही, त्यामुळे युवकांनी कौशल्य विकसित करण्याबरोबरच मिळेल ती नोकरी स्वीकारण्याची मानसिकता बाळगावी, असे आवाहन केले.
नोकरी तुमच्या घरापर्यंत येणार नाही!
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, युवकांनी उपलब्ध साधनांचा आणि रोजगार मेळाव्यांचा फायदा घेत नोकऱ्यांसाठी प्रयत्न करावेत. त्यांनी उद्योजक होऊन इतरांना नोकरी देण्याचे स्वप्न बाळगावे. तुमच्या घरापर्यंत नोकरी येणार नाही, त्यासाठी काही प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.