वेर्णा पोलिसांची सांकवाळमधील व्हिलावर धाड; उधळला भारत-पाकिस्तान सामन्यावरील बेटींगचा पट

५ जणांना अटक तर सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th September, 04:04 pm
वेर्णा पोलिसांची सांकवाळमधील व्हिलावर धाड; उधळला भारत-पाकिस्तान सामन्यावरील बेटींगचा पट

पणजी : रात्रीचा काळोख... सर्वत्र शांतता... पण या शांततेत एका व्हिलाच्या आत हाय-व्होल्टेज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठा सट्टा सुरू होता. मात्र, वेर्णा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अचानक धाड टाकली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांकवाळ येथील एका व्हिलावर टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी पाच जणांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही थरारक घटना काल रविवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. वेर्णा पोलिसांच्या पथकाला एका व्हिलामध्ये ऑनलाइन सट्टेबाजी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर आणि पोलीस उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री ११.३० च्या सुमारास ताटा रिओ द गोवा जवळच्या व्हिलावर  छापा टाकला. पोलिसांनी आत प्रवेश करताच, समोरचे दृश्य पाहून तेही चक्रावून गेले. पाच संशयित मोठ्या पडद्यावर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर पैजा लावत होते आणि त्यांच्या समोर मोबाईल, लॅपटॉपचा मोठा पसारा मांडलेला होता.

पोलिसांनी घटनास्थळावरून मध्य प्रदेशचा दीपक कारवानी (वय ३५), बिहारमधील मनोज मुखिया (वय २५) आणि मदन मुखिया (वय ४४), तर महाराष्ट्रातील जगदीश चौधरी (वय ४०) आणि अरविंद विश्वकर्मा (वय २५) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, ते झुवारीनगर येथील एका भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले.

या कारवाईदरम्यान, पोलिसांनी ५४ मोबाईल फोन, सात लॅपटॉप, दोन इंटरनेट राउटर, एक टीव्ही संच, १७ बँक पासबुक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. या पाचही संशयितांना अटक करण्यात आली असून, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंह वर्मा, मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस पुढील तपास करत आहेत. 


हेही वाचा