मुख्यमंत्री : सुटकेनंतर पोलीस वकिलांना आणि वकील पोलिसांना देतात दोष
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत पोलीस अधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पीडितांचा त्रास कमी होण्यासह गुन्हेगार सुटू नयेत यासाठी पोलीस, वकील आणि संबंधितांमध्ये चांगला समन्वय असणे आवश्यक आहे. समन्वय नसेल तर गुन्हेगार सुटतात. गुन्हेगार सुटल्यानंतर पोलीस वकिलांना आणि वकील पोलिसांना दोष देतात. चौकशी व तपास योग्य तऱ्हेने होऊन गुन्हेगार सुटू नयेत यासाठी कायद्याविषयी प्रशिक्षण देणे गरजेचे ठरते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पोलीस, वकील आणि फॉरेन्सिक अधिकाऱ्यांना तीन नव्या कायद्याविषयी प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम पार पडला. तिन्ही खात्यांच्या एकूण ६५ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. भारतीय न्याय संहिता (बीएनएस), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) आनी भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे लागू झाले आहेत. पीडितांना दिलासा मिळावा, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हे नव्या कायद्यामागील हेतून आहेत. ब्रिटिश राजवटीपासून देशात भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी दंड संहिता (सीआरपीसी) आणि इंडियन एविडन्स अॅक्ट हे कायदे होते. न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने कायद्यात बदल केले आहेत. नव्या कायद्यांच्या कार्यवाहीसाठी पोलीस तसेच अन्य संबंधितांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. आता ज्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे, त्यांनी खात्यातील अन्य संबंधितांपर्यंत प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान पोहोचवणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
‘गोवा पोलीस - योस्का’ या अॅपचा शुभारंभ
पोलिसांच्या निरोगी आरोग्यासाठी ‘गोवा पोलीस - योस्का’ या अॅपचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला. जनतेला चांगली सेवा देण्यासाठी पोलिसांनी निरोगी राहणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी पोलिसांनी अॅपचा वापर योग्यप्रकारे करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.