विदेशी महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार; हेल्थ-वेच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टराला अटक

सांगलीत आवळल्या मुसक्या : संशयितावर तातडीने निलंबनाची कारवाई


12th September, 11:44 pm
विदेशी महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार; हेल्थ-वेच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टराला अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जुने गोवे येथील हेल्थ-वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या एका विदेशी महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. वृषभ दोशी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. ३१ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. १० सप्टेंबर रोजी पीडितेच्या बहिणीने जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित डॉक्टरच्या अटकेची कारवाई केली.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरोक्का येथील महिला जुने गोवे येथील हेल्थ-वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. तिला हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मूळचा सोलापूर (महाराष्ट्र) येथील संशयित डॉ. वृषभ दोशी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी डॉक्टरने महिलेच्या असाहाय्य आणि गंभीर स्थितीचा गैरफायदा घेतला. घटनेनंतर तो गोव्यातून पसार झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या एका विशेष पथकाने संशयित डॉ. दोषी याला सांगली (महाराष्ट्र) येथून अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(ई) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जुने गोवा पोलीस करत आहेत.
पीडितेला सर्वतोपरी मदतीचे हॉस्पिटलचे आश्वासन
विदेशी महिला रुग्णावर झालेल्या लैंगिक अत्याच्याराच्या घटनेनंतर हेल्थ-वे हॉस्पिटल व्यवस्थापनाने तातडीने संशयित डॉ. वृषभ दोशी याला निलंबित केले. हेल्थवे हॉस्पिटलने पीडित विदेशी महिलेला पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या ती महिला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या कठीण काळात तिला सर्व नैतिक आणि आवश्यक मदत पुरवण्याची ग्वाहीही हेल्थ-वे हॉस्पिटल व्यवस्थापनाने दिली आहे.      

हेही वाचा