पाच ठार, अनेक जखमी : कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील दुर्घटना
मोसळे होसहळ्ळी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसलेला ट्रक.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
हासन : गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव मालवाहू ट्रक घुसल्याने ५ जण ठार झाल्याची दुर्घटना कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील मोसळे होसहळ्ळी येथे घडली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्यांची संख्या अधिक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सायंकाळी मोसळे होसहळ्ळी येथील हासन-होळेनरसिपूर मार्गावरून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक चालली होती. या मिरवणुकीत शेकडो गणेशभक्त सहभागी झाले होते. अनेकांनी गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला होता. इतक्यात भरधाव ट्रक थेट मिरवणुकीत घुसला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून नजीकच्या इस्पितळात हालवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी हालवले. होळेनरसिपूरचे आमदार एच. डी. रेवण्णा, त्यांचे चिरंजीव विधान परिषदेचे आमदार सूरज रेवण्णा यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार स्वरूप प्रकाश यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या हासनमधील रुग्णालयाला भेट दिली आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपघाताची माहिती मिळताच नजीकच्या गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. ट्रक चालकाचे नियंत्रण कसे सुटले हे मात्र समजू शकलेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.