६ अधीक्षक, ५ उपअधीक्षकांसह गोवा पोलिसांत १२३ पदांची निर्मिती

प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील


11th September, 05:24 am
६ अधीक्षक, ५ उपअधीक्षकांसह गोवा पोलिसांत १२३ पदांची निर्मिती


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारने ‘गोवा पोलीस सेवा नियमावली २०२२’ मध्ये दुरुस्ती केली आहे. पोलीस खात्यातील वरिष्ठ श्रेणी (अधीक्षक) आणि कनिष्ठ श्रेणी (उपअधीक्षक) मिळून ९६, तर प्रतिनियुक्ती, सुटी, प्रशिक्षण राखीव मिळून २७ मंजूर केली आहेत. त्यामुळे पोलीस खात्यात वरील दोन्ही पदांसह एकूण १२३ पदे निर्माण केली जाणार आहेत. कॅडर वगळून आणखी चार पदांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
कार्मिक खात्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वरील प्रस्ताव सादर केला. २६ मे २०२२ रोजी अधिसूचना जारी करून पोलीस खात्यासाठी वरिष्ठ श्रेणी (अधीक्षक) आणि कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याच्या (उपअधीक्षक) बढतीसाठी ‘गोवा पोलीस सेवा नियमावली २०२२’ लागू केली होती. त्यावेळी भारतीय राखीव दलाचे (आयआरबी) ९ उप कमाडंन्ट आणि २१ उपअधीक्षक पदांचा समावेश करण्यात आला होता. खात्यात सहा वरिष्ठ श्रेणी अधिकारी तथा अधीक्षक पदे तयार केली होती. या पदांचा समावेश वरील सेवा नियमावलीत केला नव्हता. वरील सहा पदे तयार करताना संबंधित कनिष्ठ क्षेणी अधिकाऱ्याची (उपअधीक्षक) पदे नसल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस सेवा नियमावलीत बदल करण्यात आले. खात्यात २८ वरिष्ठ श्रेणी (अधीक्षक), ६८ कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याच्या (उपअधीक्षक) मिळून ९६ पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे ६ अधीक्षक, ५ उपअधीक्षक मिळून ११ पदे वाढली आहेत.
याशिवाय प्रतिनियुक्ती, सुटी, प्रशिक्षण राखीव अंतर्गत ९ वरिष्ठ श्रेणी (अधीक्षक), १८ कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याच्या (उपअधीक्षक) मिळून २७ पदे मंजूर करण्यात आली आहे. यात पाच पदांची वाढ झाली आहे. गोवा लोकायुक्त आणि मानव अधिकार आयोग मिळून दोन अधीक्षक आणि दोन उपअधीक्षक मिळून चार पदांना मंजुरी दिली आहे. लवकरच याबाबतची अधिसूचना जारी होणार आहे.             

हेही वाचा