मृत विद्यार्थ्याच्या शरिरात प्रथमच आढळले ड्रग्ज

पोलीस अधीक्षक : बिट्स पिलानी विद्यार्थी मृत्यू प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास


12th September, 11:46 pm
मृत विद्यार्थ्याच्या शरिरात प्रथमच आढळले ड्रग्ज

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये डिसेंबर २०२४ पासून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच मृत पावलेल्या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या शरिरात ड्रग्ज आढळले आहे. पाचपैकी हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यामध्ये ड्रग्ज आढळले आहे. ऋषी नायरला ड्रग्ज कसे आणि कुठून मिळाले, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. बिट्स पिलानीसह कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या आवारात ड्रग्ज आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिला.
शुक्रवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अधीक्षक वर्मा पुढे म्हणाले, पोलिसांनी शाळा, महाविद्यालयांजवळील दुकाने आणि आस्थापनांची तपासणी मोहीम आधीच सुरू केली असून, ती आणखी तीव्र केली जाईल. बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून अचानक तपासणी केली जात आहे. कॅम्पस सुरक्षारक्षक आणि स्थानिक पोलीस यांच्यात नियमित संपर्क असून शैक्षणिक संस्थांमध्ये होणारा ड्रग्जचा पुरवठा रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्यांवर कारवाई करा : सिल्वा
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये वर्षभरात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अलीकडेच मृत पावलेल्या ऋषी नायरच्या शरीरात ड्रग्जचे अंश आढळले. ही गंभीर परिस्थिती शैक्षणिक संस्था आवारातड्रग्जचा अनियंत्रित प्रसार झाल्याचे दर्शवते. शैक्षणिक संस्थांजवळील ड्रग्ज पुरवठादारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करा. विद्यार्थ्यांची गर्दी होणाऱ्या ठिकाणांची तपासणी वाढवा. पोलिसांना ड्रग्जविषयी माहिती देणारी व्यवस्था निर्माण करा, अशी मागणी ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी केली. आमदार सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी अमलीपदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्याचे आश्वासन दिले.

बिट्स पिलानीविरुद्ध गुन्हा नोंदवा : काँग्रेस
बिट्स पिलानी विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात बिट्स पिलानी, गोवा कॅम्पसच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवा, अशी मागणी काँग्रेसने केली. याबाबत काँग्रेसचे विधिमंडळ नेते युरी आलेमाव आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात युरी आलेमाव म्हणतात, ऋषी नायर याच्या शरिरात तीन प्रकारचे ड्रग्ज आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी उपाययोजना लागू करण्यात संस्था अपयशी ठरली असेल, तर व्यवस्थापनालाही जबाबदार धरावे. प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

विद्यार्थांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा : गोवा फॉरवर्ड
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये मागील नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यातील केवळ एकाच्या शवचिकित्सा अहवालात ड्रग्ज आढळल्याचे सांगण्यात येते. बाकीचे चार विद्यार्थी कशामुळे मृत पावले याचे कारण कुणीही दिलेले नाही. जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी केली.

पोलिसांचा योग्य दिशेने तपास : मुख्यमंत्री
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास सुरू आहे. बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसमध्ये अंमली पदार्थांच्या कथित व्यवहारांबाबतही पोलीस चौकशी करत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी म्हटले आहे. रँडोक्स चाचणीनंतर मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पोटात अमलीपदार्थांचे अंश सापडले आहेत. बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये अमलीपदार्थांचा व्यवहार चालत असल्याची चर्चाही या अनुषंगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

हेही वाचा