कुटबणातील कामगाराचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th September, 12:28 am
कुटबणातील कामगाराचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मृत्यू

मडगाव : कुटबण येथील ट्रॉलर्सवर कार्यरत कामगार देबाशन किसन (५०, रा. वेळ्ळी, मूळ ओडिशा) याचा मृत्यू झाला. कामगाराला २९ ऑगस्टपासून अतिसाराचा त्रास होत असल्याने इस्पितळात दाखल केले होते. डिस्चार्ज दिल्याच्या रात्रीच प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला.

कुंकळ्ळी पोलिसांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कुंकळ्ळी पोलिसांनी कामगाराच्या कुटुंबीय, सहकारी व ट्रॉलर्स मालकाकडे चौकशी केली असता देबाशन याला २९ ऑगस्टपासून अतिसाराचा त्रास होत असल्याने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले होते. ३ सप्टेंबर रोजी देबाशन याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर रात्री जेवण करुन तो झोपी गेला. सकाळी ६ वाजता पाणी पिऊन पुन्हा झोपी गेला. त्यानंतर तो बेशुद्धावस्थेतच आढळून आला. त्याला नजीकच्या खासगी वैद्यकीय अधिकार्‍याकडे नेण्यात आले. तेथून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले असता, मृत घोषित करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालानंतरच कामगाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते समोर येणार आहे. दरम्यान, कुटबण जेटीवर नजीकच्या काळात अनेक कामगारांना अतिसाराचा त्रास जाणवलेला असून कॉलराचा रुग्णही आढळून आला होता. 

हेही वाचा