गोमंतकीयांच्या आहारात कॅलरी, फॅट, प्रोटीनचे सेवन वाढले

केंद्रीय अहवालातील माहिती : ग्रामीण, शहरी भागात लक्षणीय वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd September 2025, 11:48 pm
गोमंतकीयांच्या आहारात कॅलरी, फॅट, प्रोटीनचे सेवन वाढले

पणजी : गोव्यातील लोकांच्या दैनंदिन आहारात कॅलरी, फॅट आणि प्रोटीनचे सेवन वाढल्याचे एका ताज्या केंद्रीय अहवालातून समोर आले आहे. शहरी व्यवहार मंत्रालयाने गोव्यातील ७२० कुटुंबांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे. यात ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येकी ३६० कुटुंबांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कुटुंबातील एक व्यक्ती दररोजच्या आहारामधून किती प्रमाणात प्रोटीन, कॅलरी आणि फॅट घेते याची माहिती घेण्यात आली होती. हे सर्व्हेक्षण २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये करण्यात आले होते.
अहवालांनुसार, २०२२-२३ मध्ये गोव्यातील ग्रामीण भागात दररोज दरडोई २,४७६ किलो कॅलरीचे सेवन होत होते. २०२३-२४ मध्ये ते वाढून २,५८४ किलो कॅलरी झाले. शहरी भागात २०२२-२३ मध्ये दिवसाला दरडोई २,५३५ किलो कॅलरीचे सेवन होत होते. २०२३-२४ मध्ये ते वाढून २,७४७ किलो कॅलरी झाले. २०२२-२३ मध्ये ग्रामीण भागाची राष्ट्रीय सरासरी २,२३३, तर शहरी भागाची राष्ट्रीय सरासरी २,२५० किलो कॅलरी होती. ती २०२३-२४ मध्ये कमी होऊन अनुक्रमे २,२१२ आणि २,२४० झाली.
गोव्यातील ग्रामीण भागात २०२२-२३ मध्ये आहारातून दररोज दरडोई ८१.५ ग्रॅम प्रोटीनचे सेवन होत होते. २०२३-२४ मध्ये हे वाढून ८३.७ ग्रॅम झाले. शहरी भागात हे प्रमाण ८३.७ ग्रॅम वरून ८६.६ ग्रॅम झाले.
२०२२-२३ मध्ये ग्रामीण भागात राष्ट्रीय सरासरी ६१.९ ग्रॅम वरून २०२३-२४ मध्ये ६१.८ ग्रॅम झाली. तर शहरी भागात ६३.२ वरून ६३.४ ग्रॅम इतकी झाली. याशिवाय एका वर्षात गोव्यातील ग्रामीण भागात आहारातून फॅट घेण्याचे प्रमाण १०.४ ग्रॅमने तर शहरी भागात १५.४ ग्रॅमने वाढले आहे.
दिवसाला जेवण घेण्याचे प्रमाण कमी
अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये गोव्यातील ग्रामीण भागातील एक व्यक्ती ३० दिवसांत सरासरी ६२ वेळा जेवते, तर शहरी भागात हे प्रमाण ६१ आहे. या तुलनेत, राष्ट्रीय सरासरी ग्रामीण भागात ७८ आणि शहरी भागात ७५ आहे. याचा अर्थ, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यातील लोक कमी वेळा जेवण करतात. या बाबतीत गोवा क्रमवारीत शेवटच्या स्थानावर आहे. 

हेही वाचा