योग्य काळजी न घेतल्यास उद्भवू शकतो गंभीर स्वरूपाचा दम्याचा आजार

मुंबई : सकाळी जाग येताच सतत शिंका येणे, नाक वाहणे किंवा बंद होणे हे आजकाल अगदीच कॉमन झाले आहे. दिवस जसा जसा पुढे जाईल तसा त्रास कमी होतो, पण सकाळचा पहिला तास मात्र नाक-डोक्याला हैराण करून टाकतो. हे केवळ हवामान बदल, धूळ किंवा प्रदूषणामुळे होते, असे समजून अनेकजण ते दुर्लक्षित करतात. पण डॉक्टर सांगतात की यामागे एलर्जिक रायनायटिस ही गंभीर समस्या असू शकते.
या आजाराला सामान्य भाषेत हे-फीवर म्हणतात. यात नाक एखाद्या एलर्जनच्या (धूळ, परागकण, धूर, पाळीव प्राण्यांचे केस किंवा बुरशी) संपर्कात येताच संवेदनशील होते. नाकात सूज येते, सतत शिंका येतात, नाक वाहते किंवा बंद राहते, डोळ्यांत वारंवार पाणी येते आणि दिवसभर थकवा व चिडचिडेपणा जाणवतो. सकाळी हा त्रास जास्त का होतो ? तर तज्ज्ञ सांगतात की सकाळच्या वेळी शरीरात हिस्टामिन नावाचे रसायन जास्त प्रमाणात सक्रिय असते. यामुळे एलर्जिक प्रतिक्रिया तीव्र होते. त्यातच रात्रभर खिडक्या-दारे उघडी राहिल्यास धूळ, ओलावा किंवा परागकण खोलीत जमा होतात. सकाळी ते नाकाच्या संपर्कात आल्यावर जोरदार शिंका सुरू होतात.
सर्दी-पडसे आणि तत्सम अजारांशी मिळती जुळती लक्षणे असल्याने अनेकदा लोकांची गल्लत होते. पण फरक फार मोठा आहे. सर्दी-पडसे व्हायरसमुळे होते आणि काही दिवसांत थांबते. तर एलर्जिक रायनायटिस हा एलर्जनमुळे होतो आणि एलर्जन जोपर्यंत आसपास आहे, तोपर्यंत लक्षणे टिकून राहतात. म्हणून हा त्रास महिनोनमहिने किंवा वर्षानुवर्षेही चालू राहू शकतो. कुटुंबात एलर्जीचा इतिहास असलेले, प्रदूषण व धुळीत काम करणारे, अस्थमा किंवा श्वसनविकार असलेले तसेच कमकुवत प्रतिकारशक्तीचे काही लोक या आजाराला जास्त बळी पडतात.
बचावासाठी डॉक्टर काही साधे उपाय सुचवतात :
बेडरूम नेहमी स्वच्छ व धूळमुक्त ठेवा, खिडक्या-दारे बंद ठेवा, एलर्जन-प्रूफ बेडिंग वापरा, आठवड्यातून एकदा गरम पाण्यात बेडिंगचे कपडे धुवा, झोपण्यापूर्वी अंघोळ करा, पाळीव प्राण्यांना बेडरूमपासून दूर ठेवा आणि गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.

वेळीच उपचार न घेतल्यास हा आजार सायनस इन्फेक्शन, दमा किंवा इतर श्वसनविकार वाढवू शकतो. कायमस्वरूपी इलाज नसला तरी योग्य काळजी, औषधे, नेजल स्प्रे, सलाइन वॉश किंवा इम्यूनोथेरपीसारख्या उपचारांनी हा त्रास नियंत्रणात आणता येतो. त्यामुळे, सकाळी उठताच वारंवार शिंका येत असतील, नाक वाहते किंवा बंद राहत असेल, तर ते दुर्लक्षित न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेवर उपाय केल्यास सकाळची एलर्जी कंट्रोलमध्ये आणता येते आणि दिवस मोकळा, हलका आणि आनंदी घालवता येतो.