पंकज कुमार, अतुल वाणी यांच्याविरोधात लाचप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

कंपनीचे प्रलंबित बिल देण्यासाठी मागितली होती १ लाखांची लाच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd September 2025, 12:25 am
पंकज कुमार, अतुल वाणी यांच्याविरोधात लाचप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

पणजी : लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने पंकज कुमार, अतुल वाणी यांच्याविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

मनुष्यबळ सेवा पुरवणार्‍या कंपनीचे प्रलंबित बिल देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयकर खात्याच्या लेखा विभागात सेवा बजावणार्‍या सीएजीचे (कंट्रोलर ऑफ अकाऊंट जनरल) अधिकारी पंकज कुमार आणि अतुल वाणी या दोघांवर कारवाई केली होती. या प्रकरणी सीबीआयने वरील दोघांच्या विरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणी राज एटंरप्राईजेस कंपनीचे मालक कमलाकांत चतुर्वेदी यांनी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, कंपनीचे सात महिन्यांचे बिल देण्यासाठी संशयित पंकज कुमार याने २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद केले. याची दखल घेऊन सीबीआयचे उपअधीक्षक अर्जुन कुमार मोर्या यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याच दरम्यान संशयितांनी लाचेची रक्कम देण्यासाठी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पाटो येथे तक्रारदाराला बोलाविले. ठरल्याप्रमाणे सीबीआयने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी पाटो- पणजी येथील सेंट्रल लायब्ररीजवळ संशयितांच्या गाडीवर छापा टाकून दोघाही संशयितांना १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्या दोघांना सीबीआयने अटक केली.

न्यायालयाने पंकज कुमार आणि अतुल वाणी या दोघांना सीबीआयची कोठडी ठोठावली. याच दरम्यान त्या दोघांना उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर तपास अधिकारी संजीवन नाईक यांनी संशयित अधिकारी पंकज कुमार आणि अतुल वाणी या दोघांविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. 

हेही वाचा