बँकांची ६३७ कोटी रुपयांची फसवणूक; ईडीचे गोवा, तामिळनाडू, प. बंगालमध्ये छापे

तामिळनाडूतील अरविंद रेमेडीज लिमिटेडविरुद्ध कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd September 2025, 12:06 am
बँकांची ६३७ कोटी रुपयांची फसवणूक; ईडीचे गोवा, तामिळनाडू, प. बंगालमध्ये छापे

पणजी : पंजाब नॅशनल बँकेसह अनेक मोठ्या बँकांची ६३७ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तामिळनाडू येथील अरविंद रेमेडीज लिमिटेडविरुद्ध गोव्यासह तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे मोठी कारवाई सुरू केली आहे.

ईडीने कंपनीचे संचालक अरविंद बी. शाह यांच्यासह इतर बनावट संचालकांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहे. ईडीने गोव्यातील दोन ठिकाणांसह चेन्नई, कांचीपुरम, कोलकाता आणि इतर ठिकाणी शोध मोहीम हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रथम गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यात पंजाब नॅशनल बँकेच्या युनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, अलाहाबाद बँक, करूर वैश्य बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि कॉर्पोरेशन बँक या बँकांनी मिळून कंपनीला सुमारे ७०४ कोटी रुपयांची कर्ज सुविधा दिली होती. मात्र, कंपनीने कर्ज भरले नसल्यामुळे २०१४ ते २०१५ दरम्यान, सर्व खात्यांना एनपीए घोषित करण्यात आले. त्यावेळी थकबाकीची रक्कम ६३७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. ही रक्कम बनावट कंपनीद्वारे दुसरीकडे वळविण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा संशय असल्यामुळे ईडीने जुलै २०२१ मध्ये कारवाई सुरू केली. याचा एक भाग म्हणून ईडीने अरविंद रेमेडीज लिमिटेडचे संचालक अरविंद शाह यांच्या गोव्यासह तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील मालमत्तांवर छापासत्र सुरू केले आहे. ही कारवाई मंगळवारी उशीरापर्यंत सुरू होती. 

हेही वाचा