आतापर्यंत १९ जणांना अटक
मडगाव : मुंगूल येथील गँगवॉरप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी उशिरा चिंबल येथील महेंद्र नाईक (२१) याला अटक केली. यामुळे या प्रकरणातील अटक केलेल्यांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. पोलिसांकडून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
१२ ऑगस्ट रोजी मुंगूल माडेल येथील शगुन हॉटेलनजीक गाडी अडवून संशयितांनी तलवार, कोयता, सोडा बॉटल्सचा वापर करत हल्ला केला होता. यावेळी गोळीबारही करण्यात आला होता. पोलिसांनी हे गँगवॉर असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेत रफीक ताशान (२४) आणि युवकेश सिंग बदैला (२०) हे गंभीर जखमी झाले होते.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत दक्षिण व उत्तर गोव्यांतून अनेकांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विल्सन कार्व्हालो, शाहरुख शेख (रा. दवर्ली), रसूल शेख (रा. मडगाव), मोहम्मद अली (२४), वासू कुमार (२४), सूरज माझी (१९), मलिक शेख (१८), गौरांग कोरगावकर (२४), सुनील बिलावर (२०, रा. घोगळ), जॉयस्टन फर्नांडिस (२०, नेरुल), इम्रान बेपारी (३८, रा. सांताक्रुझ), अक्षय तलवार (२२, रा. ताळसाझर), अविनाश गुंजीकर (३१, रा. नावेली), परशुराम राठोड (३२, रा. बेळगाव), दीपक कट्टीमणी (४७, रा. आके बायश), अमर कुलाल, ताहीर आणि सलीम यांचा समावेश आहे.
पोलीस तपासात उघड झाले आहे की, सरकारी कर्मचारी दीपक कट्टीमणीने या संशयितांना मदत केली होती आणि त्यांच्या वास्तव्यासाठी सोय उपलब्ध करून दिली होती. तसेच, अटक करण्यात आलेल्यांमध्ये इम्रान बेपारीसारखा कुख्यात गुंडही आहे.
सोमवारी करणार न्यायालयात हजर
सर्व संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आठ जणांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. त्यानुसार त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.