बेळगाव : अनमोड घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एका बाजूने खुला करावा, अशी जोरदार मागणी वाहनधारकांनी केली आहे. या संदर्भात ऑल गोवा लॉरी असोसिएशन तसेच बेळगाव आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील लॉरी मालक संघटनांनी एकत्र येऊन आपली भूमिका मांडली आहे.
गेल्या ४ जुलै रोजी अनमोड घाटात गोव्याच्या हद्दीतील रस्त्याचा एक भाग कोसळला. डांबराच्या पृष्ठभागावर भेगा पडल्याने हे घडले होते. त्यानंतर ५ जुलै रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून घाट मार्ग केवळ आवश्यक सेवा आणि बसेसपुरता मर्यादित केला, तर इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली. या निर्णयामुळे सध्या गोवा–कर्नाटक दरम्यानच्या वाहनांना कारवार किंवा चोर्ला घाट मार्गाने १०० ते १५० किमीचा फेरा मारावा लागत आहे. परिणामी मालवाहतुकीचा खर्च प्रचंड वाढला असून त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमतींवर होऊ लागला आहे. वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे सीमाभागातील अनेक जडवाहन मालकांनी आपली वाहने बंद ठेवली आहेत. अनेक जणांचे बँकेच्या कर्जाचे हप्ते थकले असल्याने अनेकांची आर्थिक ओढाताण झाली आहे.
दरम्यान, घाटातील कोसळलेल्या ठिकाणी तात्पुरत्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. लोखंडी रॉड बसवून रस्ता मजबूत करण्याचा प्रयत्न झाला असला तरी संपूर्ण दुरुस्तीला अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे वाहतूकदारांनी सर्व प्रकारच्या वाहनांना एका बाजूने घाट मार्गावरून सोडण्याची मागणी केली असून, यासाठी होमगार्ड नेमून सतत देखरेख ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.