रायचूर जिल्ह्यातील घटना; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
बेळगाव : रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर तालुक्यातील मुकुंदा गावात पावसाळ्यात स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे ग्रामस्थांसाठी मोठी कसरत ठरत आहे. काल गुरुवारी गावातील एका वयोवृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना ‘हरिगोलू’ तयार करून मृतदेह खांद्यावर घेत वाहत्या तुंगभद्रा नदीतून पोहत बेटावर असलेल्या स्मशानभूमीत जावे लागले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.मृतदेह खांद्यावर घेत ‘हरिगोलू’वरून नदी पार करणाऱ्या पुरुषांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तुंगभद्रा जलाशयातून पाणी सोडले की नदीला पूर येतो. अशा वेळी कुणाचे निधन झाले की स्मशानभूमीत जाण्यासाठी अशाच धोकादायक पद्धतीचा आधार घ्यावा लागतो. याबाबत अनेकदा शासनाकडे मागणी करूनही अद्याप पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. ग्रामस्थ नागराज देवरमणी आणि रुद्रमुनीतात यांनी आमदार हंपानगौडा बदरली यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तहसीलदार अरुण एच. देसाई यांनी सांगितले की, गावातील सर्वे नंबर २३८/२ मधील १.३ एकर जागा स्मशानभूमीसाठी राखीव असून आणखी दोन एकर जागा निश्चित करण्यात आली आहे, मात्र वास्तुशास्त्रीय कारणांमुळे गावकरी ती वापरण्यास तयार नाहीत. ग्रामस्थ चंद्रशेखर रेड्डी यांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली.