खोदकामात सापडली मानवी कवटी, हाडे
धर्मस्थळ : कर्नाटकातील धर्मस्थळ (Dharmasthala-karnataka) परिसरात शेकडो हत्यांचे गूढ (Murder Mystery) उलगडण्यास सुरुवात झाली असून, या प्रकरणामुळे कर्नाटकसह देशभरात खळबळ उडाली आहे. एका माजी स्वच्छता कर्मचाऱ्याच्या धक्कादायक खुलाशानंतर येथे गुप्तपणे पुरण्यात आलेल्या मृतदेहांचे रहस्य उघडकीस आले आहे. या खुलाशा नुसार, १९९५ ते २०१४ दरम्यान अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्या आणि त्यांचे मृतदेह धर्मस्थळ परिसरात पुरण्यात आले.
या कर्मचाऱ्याने पोलिसांकडे पुरावे म्हणून फोटो, व्हिडिओ आणि हाडांचे तुकडे सादर केल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. त्याने दाखवलेल्या १३ ठिकाणी उत्खनन सुरू आहे. उर्वरित ठिकाणी अद्याप ठोस पुरावे सापडले नसले तरी सहाव्या ठिकाणी मानवी कवटी, हाडे आणि ओळखपत्र मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणा सतर्क आहे.
या प्रकरणात आणखी एका व्यक्तीने पुढे येत साक्ष दिली आहे की, १५ वर्षांपूर्वी त्याने एका तरुणीचा मृतदेह (dead body ) पुरताना प्रत्यक्ष पाहिले होते. बंगलगड्डे टेकडी परिसरातही मानवी अवशेष आढळले आहेत. मिळालेल्या सर्व नमुन्यांची डीएनए आणि फॉरेन्सिक ( Forensic) तपासणी सुरू आहे. या प्रकरणातील वर्णन केवळ एखाद्या भयपटात (horror movie) शोभेल असे असून, त्यामागे अनेक अमानवी अत्याचारांचा इतिहास दडलेला असल्याचे संकेत मिळत आहेत.
काही ठिकाणी मृतदेह नेत्रावती नदीकिनारी (River Netravati ) गाडण्यात आले तर काही प्रकरणांमध्ये चेहऱ्यावर अॅसिड टाकून शव जाळण्यात आले. इतकेच नव्हे तर एका अल्पवयीन मुलीला तिच्या शाळेच्या पाठीवरील बॅगसह गाडण्यात आले असल्याचाही आरोप आहे. सध्या सुरू असलेल्या उत्खनन आणि तपासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून, पुढील काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.