बुकिंगचा गैरकारभार रोखण्यासाठी रेल्वेचा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’

२.५ कोटी आयडींना ‘ब्लॉक’चा ब्रेक : रेल्वेची ‘क्लीन बुकिंग’ मोहीम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd August, 11:38 am
बुकिंगचा गैरकारभार रोखण्यासाठी रेल्वेचा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’

नवी दिल्ली : रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये वारंवार बिघाडाच्या तक्रारी येत असतात. हे थांबवण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेने आयआरसीटीसीचे २.५ कोटींपेक्षा जास्त युजर्सचे आयडी बंद केले आहेत. डेटाच्या विश्लेषणात काही युजर्सच्या बुकिंग पॅटर्नवर संशय आल्याने त्यांच्या आयडी बंद करण्यात आल्या आहेत. सरकारने संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

खासदार ए. डी. सिंह यांनी संसदेत यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यांनी विचारले की, आयआरसीटीसीचे कोट्यवधी युजर्सचे आयडी का बंद करण्यात आले, तिकीट बुकिंग सुरू होताच तिकीट कशी गायब होतात? हे थांबवण्यासाठी रेल्वे काय पावले उचलत आहे? यावर उत्तर देताना सरकारने माहिती दिली की, तिकीट बुकिंगमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आयआरसीटीसीने २.५ कोटींपेक्षा अधिक युजर आयडी बंद केले आहेत. तपासात या आयडींमधून तिकीट बुकिंग करताना अनियमितता आढळून आली आहे.

रेल्वेने सांगितले की, वर्षभर तिकिटांची मागणी सारखी नसते. काही काळात ती खूप जास्त असते तर काही काळात कमी. काही गाड्या अत्यंत लोकप्रिय असतात आणि कमी वेळात प्रवास पूर्ण करतात, त्यामुळे त्यांची तिकिटे लवकर संपतात. प्रवाशांना कन्फर्म तिकिटे सहज मिळावीत, बुकिंगमध्ये पारदर्शकता राहावी आणि अधिकाधिक लोकांनी ऑनलाइन तिकिटे बुक करावीत यासाठी रेल्वेने अनेक उपाय केले आहेत.

सुमारे ८९ टक्के तिकिटे ऑनलाईन बुक 

आपण ऑनलाइन किंवा रेल्वे काउंटरवर जाऊन तिकीट बुक करू शकता. सध्या सुमारे ८९ टक्के तिकिटे ऑनलाईन बुक केली जातात. रेल्वे काउंटरवरही तुम्ही डिजिटल पेमेन्ट करू शकता. आता आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर तुम्हाला आधार कार्डने व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. एजंट तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होण्याच्या पहिल्या ३० मिनिटांपर्यंत तिकिटे बुक करू शकणार नाहीत.

हेही वाचा