एअर इंडिया अपघातानंतर मृतदेह ओळख प्रक्रियेवर संशय जाहीर

ब्रिटिश कुटुंबियांची पारदर्शक चौकशीची मागणी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd August, 10:17 am
एअर इंडिया अपघातानंतर मृतदेह ओळख प्रक्रियेवर संशय जाहीर

नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ५२ ब्रिटिश प्रवाशांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ओळख पटवण्याच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यूकेतील स्टोन लॉ या कायदेशीर संस्थेच्या माहितीनुसार, भारतातून पाठवले गेलेले १२ मृतदेह तपासले असता त्यापैकी दोन मृतदेहांची ओळख चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 ब्रिटिश वकील जेम्स हीली-प्रॅट यांनी भारताच्या एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे कॉकपिट रेकॉर्डिंग, इंधन कट-ऑफ यांसारखी महत्त्वाची पुरावे कुटुंबीयांना देण्याची मागणी केली आहे. यासोबतच सुमारे ४० मृतदेहांच्या ओळखीबाबत शंका निर्माण झाली असून काही मृतदेहांवर दरम्यान अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात या प्रकरणावर झालेल्या चर्चेनंतर डीएनए मॅचिंग प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. काही मृतदेहांची ओळख लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारत-इंग्लंड-अमेरिकेमधील कायदेशीर कारवाई प्रक्रियेतील विलंबामुळे टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या ५०० कोटींच्या नुकसानभरपाई योजनेबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशीही त्यांची मागणी आहे.

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या या विमानात २४२ प्रवासी होते. अपघातात एकूण २७० जणांचा मृत्यू झाला, ज्यात विमान कोसळलेल्या मेडिकल हॉस्टेलमधील २९ जणांचा समावेश होता.











हेही वाचा