ऑनलाईन पद्धतीने पर्यटकांची फसवणूक; मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून सीबीआय चौकशी

केंद्रीय गृहमंत्र्यांचे कोकणीतून पत्र; गोवा सरकारचे कौतुक


17 hours ago
ऑनलाईन पद्धतीने पर्यटकांची फसवणूक; मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून सीबीआय चौकशी


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ऑनलाईन पद्धतीने गोव्यातील मालमत्ता दाखवून पर्यटकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या विनतीवरून केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी सुरू केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोकणीतून पत्र लिहून गोवा सरकारने सायबर क्राईम रोखण्यासाठी उचललेल्या पावलाचे कौतुक केले आहे. सायबर क्राईम रोखण्याच्या लढाईत केंद्राचे सहकार्य राहील, असे आश्वस्त केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील पंकज धीमन यांनी हणजूण पोलीस स्थानकात १२ जानेवारी २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, त्यांनी आपल्या कुटुंबीयासाठी १० रात्री वागातोर येथे राहण्यासाठी ‘बुकिंग डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून रुबी नामक व्हिला आरक्षित करून ठेवला. त्यासाठी धीमन यांनी २० हजार रुपये गुगल पेद्वारे मोहम्मद गोरेमिया याच्या खात्यात जमा केले होते. वागातोर येथील वरील व्हिला २४ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीसाठी बुक करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे धीमन कुटुंबीय गोव्यात आले. वागातोर येथे रूबी व्हिला अस्तित्वात नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. संशयित मोहम्मद गोरेमिया अस्तित्वात नसलेल्या व्हिलाचे संकेतस्थळावरून ‘रुबी व्हिला गोवा’ नावाने बुकिंग घेत असल्याचे समोर आले. धीमन यांच्या तक्रारीची दखल घेऊन हणजूणचे पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहील वारंग यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सीबीआयच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून तपास सुरू
ऑनलाईन फसवणूक करणारे टोळीने काम करत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी धीमन यांच्या फसवणुकीचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे ठरविले. अवर सचिव मनीश केदार यांनी या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. सीबीआयच्या मुंबई आर्थिक गुन्हा विभागाने २८ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याविषयीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोकणीतून पत्र लिहून दिली आहे. पत्रात त्यांनी गोवा सरकारचे कौतुकही केेले आहे.