अतिरिक्त दंडही लागणार : १ ऑगस्टपासून लागू
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली आहे. हे नवीन शुल्क १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय घेण्यामागे रशियाकडून तेल आणि संरक्षण सामग्रीची खरेदी आणि भारताचे कठीण व त्रासदायक व्यापाराच्या अटी, ही दोन प्रमुख कारणे असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू होती; परंतु कोणतीही ठोस सहमती न झाल्याने ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी २ एप्रिल २०२५ रोजी भारतीय वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ लावले होते; परंतु नंतर लगेचच ते शुल्क तात्पुरते मागे घेतले होते. मात्र, आता पुन्हा अधिक कठोर भूमिका घेत त्यांनी २५ टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड लागू करण्याची घोषणा केली आहे.
निर्णय जाहीर करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
भारत हा आपला मित्र आहे; परंतु अनेक वर्षांपासून आपण भारतासोबत फारसा व्यापार करू शकलो नाही.
भारताचे आयात शुल्क खूपच जास्त आहे.
भारताचे गैरआर्थिक व्यापार अडथळे अत्यंत कठीण व त्रासदायक आहेत.
भारत नेहमीच रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी उपकरणे खरेदी करत आला आहे.
चीनसह भारत रशियाचा सर्वांत मोठा ऊर्जा खरेदीदार आहे.
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग रशियावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात असताना भारताचा पवित्रा अत्यंत निराशाजनक आहे.
भारताच्या निर्यातीवर परिणाम शक्य
या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः टेक्सटाइल्स, औषधे, ऑटो पार्ट्स, स्टील आणि कृषी उत्पादने या क्षेत्रांमध्ये अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे सरकारला आता नव्याने अमेरिकेशी चर्चेची दिशा ठरवावी लागणार आहे.