कोलारच्या महिलेच्या शरीरात आढळला जगातील पहिला नवा रक्तगट

डॉक्टरांकडून सीआयआरबी नावाने घोषित

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
30th July, 07:55 pm
कोलारच्या महिलेच्या शरीरात आढळला जगातील पहिला नवा रक्तगट

बंगळुरू : कोलार (कर्नाटका) जिल्ह्यातील एका ३८ वर्षीय महिलेच्या रक्तात जगात यापूर्वी कधीही न आढळलेला नवीन रक्तगट सापडला आहे. ही ऐतिहासिक शोध मोहीम तिच्या हृदयशस्त्रक्रियेच्या तयारीदरम्यान सुरू झाली. सुरुवातीस तिचा रक्तगट ओ आरएज+ असल्याचे दिसले. हा सर्वसामान्य आणि सर्वाधिक आढळणारा गट आहे. मात्र, जेव्हा ओ+ रक्त पुरवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा एकाही युनिटसोबत तिचे रक्त सुसंगत ठरत नव्हते.
हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि गंभीर प्रकार लक्षात आल्यावर, प्रकरण रोटरी बंगलोर टीटीके रक्त केंद्रातील प्रगत इम्युनोहेमॅटोलॉजी संदर्भ प्रयोगशाळेकडे सुपूर्द करण्यात आले.
डॉ. अंकित माथूर यांच्या नेतृत्वाखालील टीमने प्रगत सिरोलॉजिकल तंत्र वापरून तपासणी केली. त्यांनी सांगितले, रक्त ‘पॅन-रिऍक्टिव्ह’ असल्याचे लक्षात आले, म्हणजे ते सर्व चाचणी नमुन्यांसोबत विसंगत होत होते. ही अत्यंत दुर्मिळ किंवा अज्ञात रक्त प्रकाराची शक्यता मानून तिच्या कुटुंबातील २० सदस्यांचे रक्तनमुने तपासण्यात आले, पण एकाचाही गट जुळला नाही.
तिच्या शस्त्रक्रियेसाठी कोणतेही रक्त चढवण्याची आवश्यकता लागणार नाही याची काळजीपूर्वक योजना करण्यात आली आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
त्यानंतर या महिलेचे आणि तिच्या कुटुंबीयांचे रक्तनमुने युके मधील इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरन्स लॅबोरेटरी (आयबीजीआरएल), ब्रिस्टल येथे पाठवण्यात आले. १० महिन्यांच्या सखोल संशोधनानंतर एक नवीन रक्तगट अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले.
आयएसबीटीची मान्यता
हा नवीन शोध क्रोमर (सीआर) रक्तगट प्रणालीचा भाग असून, त्याला सीआरआयबी असे नाव देण्यात आले आहे. या नावात 'सीआर' म्हणजे ‘क्रोमर’ आणि ‘आयबी’ म्हणजे ‘इंडिया, बंगळूर’. हा ऐतिहासिक शोध जून २०२५ मध्ये इटलीतील मिलान येथे झालेल्या ३५व्या आंतरराष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेत (आयएसबीटी) अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. त्यामुळे ही कोलार जिल्ह्यातील महिला सीआरआयबी रक्तगट असलेली जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे, असे डॉ. माथूर यांनी सांगितले.

हेही वाचा