रोहन खंवटे : गोव्यात पर्यटन वाढीसाठी नवे पाऊल
पणजी : गोव्यात पर्यटन वाढवण्याच्या उद्देशाने आणि सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने गोवा-गॅटविक थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत दिली. गोव्यात वर्षाकाठी पर्यटन वाढीचा दर ८.४ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पर्यटन, माहिती तंत्रज्ञान व मुद्रण विभागाच्या मागण्यांवरील चर्चेनंतर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत गोव्यात ५४.५ लाख पर्यटकांनी भेट दिली. त्यात ५१.८ लाख देशांतर्गत तर २.७ लाख विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. ही वाढ एकूण ८.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, जी कोविड-१९ पूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत हळूहळू वाढत असल्याचे दर्शवते. प्रत्येकवर्षी शिवोली येथे साजरा होणारा ‘सांजाव महोत्सव’ आता कायमस्वरूपी आयोजित केला जाणार आहे, अशी माहितीही पर्यटनमंत्री खंवटे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय थेट कनेक्टिव्हिटीवर भर
गोव्यात ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ सुविधा सुरू असून, आता देश-विदेशातून थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर दिला जात आहे. ऑक्टोबरपासून रशियाच्या येकातेरीनबर्ग शहरातून मोपा विमानतळावर ‘एरोफ्लोट’ची थेट विमानसेवा सुरू होणार आहे. गेल्या हंगामात या मार्गावरून १३,००० हून अधिक रशियन पर्यटकांनी गोव्यात भेट दिली होती.
धार्मिक पर्यटनासाठी ११ मंदिरांची निवड
१) धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सप्तकोटेश्वर (नार्वे), दत्त मंदिर (साखळी), महालसा (म्हार्दोळ), महादेव मंदिर (तांबडी सुर्ला) यांसह एकूण ११ प्रमुख मंदिरांची निवड करण्यात आली आहे.
२) या ठिकाणी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, या मंदिरांशी जोडणारी विशेष बससेवा गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) सुरू करण्यात आली आहे.
इतर ठळक निर्णय
१) राज्यात ४जी नेटवर्क मजबूत करण्यासाठी ६० जागांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी १४ ठिकाणी टॉवर्स उभारण्यात आले आहेत.
२) गोव्यात आतापर्यंत ७५९ स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून, त्यांना एकूण ४ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे.
३) ४१ खात्यांअंतर्गत २४७ शासकीय सेवा एका ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असून, आता या पोर्टलवर एआय चॅटबॉट सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे.
४) राज्याच्या मुद्रण विभागात आधुनिक मशिनरी आणून बदल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच कोकणीसह ‘ई-गॅझेट’ प्रणालीही कार्यान्वित केली जाणार आहे.