श्रावणी - उपाकर्म - अद्वितीय वैदिक परंपरा

Story: प्रासंगिक |
30th July, 11:42 pm
श्रावणी - उपाकर्म - अद्वितीय वैदिक परंपरा

आध्यात्मिक धर्मगुरू अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या मार्गदर्शनाने हिंदू समाज वैदिक संस्कारांचे आचरण करून द्विजत्वाची उपासना करताना आपण पाहत आहोत. प्रत्येक हिंदू व्यक्तीने यज्ञोपवीत (जानवे) धारण करून सनातन वैदिक परंपरेनुसार विधिवत चालून आलेले ऋषीमुनी कृत दिव्य सुसंस्कार सामान्य कष्टकरी जनतेला ज्ञात व्हावे या प्रधान हेतूने स्वामींच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर गेली कित्येक दशके श्रावणी विधी लाखो हिंदूंच्या साक्षीने होत आहे. उत्सर्जन - उपाकर्म, यज्ञोपवीत धारण, तर्पण सभादीपदान-आदी विधी प्रामुख्याने केले जातात.

सद्गुरूंच्या सान्निध्यात जाऊन ज्ञानामृत श्रवण करावे, यालाच श्रावणी असे म्हणतात. याचे पारिभाषिक नाव "उपाकर्म" असे आहे व याचा अर्थ ज्ञानोपासनेला प्रारंभ करणे असा आहे.

उत्सर्जन : शिष्याने जे ज्ञानग्रहण केले आहे ते सद्गुरू चरणी अर्पण करून नवीन ज्ञानार्जनास प्रारंभ करणे याला उत्सर्जन असे म्हणतात.

उपाकर्म - उपाकर्म म्हणजे प्रारंभ करणे पौराणिक संदर्भानुसार श्रावणी पौर्णिमेचा दिवस वेदाभ्यास ज्ञानप्राप्ती प्रारंभ करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे.

यज्ञोपवीत धारण : यज्ञोपवीताच्या प्रत्येक सूक्ष्मतंतूवर ॐकार, अग्नी, नाग, सोम, पितृ, प्रजापती, वायू, सूर्य आणि विश्वदेव अशा या जगाच्या उत्पत्तीकारक देवता स्थानापन्न असतात. यज्ञोपवीताच्या प्रत्येक धाग्यांवर ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद तसेच ब्रह्मग्रन्थीवर अथर्ववेद अधिष्ठित असतो. देवऋण-ऋषिऋण-पितृऋण यांची सदैव आठवण राहावी यासाठी यज्ञोपवीत धारण करावे.

तर्पण : 'तृप' म्हणजे संतुष्ट करणे 'तृप्' या धातूपासून तर्पण शब्द तयार झाला देव, ऋषी आणि पितर यांना जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजे तर्पण होय.

देवतर्पण : निसर्ग ऐश्वर्य, धन, धान्य, संपत्ती आदी आम्हाला देवाकडूनच प्राप्त झालेली आहे त्यामुळे देवांना उद्देशून देवतपर्ण करावे.

ऋषितर्पण : वेद, पुराण शास्त्रादींचे अध्ययन अध्यापन केल्याने ऋषीमुनी संतोष होतात, त्यांना तृप्ती मिळते म्हणून ऋषी तर्पण करावे.

पितृतर्पण : पितृ तर्पण म्हणजे आपल्या पितरांपैकी हयात नसलेले आजी-आजोबा-पूर्वज यांच्या नामोच्चारणाने तर्पण करून त्यांना संतुष्ट करणे म्हणजे पितृतर्पण करणे होय.

स्नान विधी : श्रावणी विधीत प्रामुख्याने भस्म, गोमय, मृत्तिका आदी संस्कारित द्रव्यांनी समंत्रक स्नान सांगितलेली आहेत. ज्या योगे आपली देहशुद्धी व चित्तशुद्धी होते.

मिंदवते होम : जीवनामध्ये किडी, मुंगी, आदी बारीक जीवांची हत्या आपल्याकडून नकळत होते तसेच श्लोक मंत्र म्हणताना अशुद्ध उच्चारणामुळे ही दोष लागतात. या सर्व दोषांच्या परिहारार्थ मिंदवते होम केला जातो.

यमप्रार्थना : आपल्या कुळामध्ये अकाली मृत्यू होऊ नये, आला असल्यास त्याला 

सद्गती प्राप्त व्हावी यासाठी यम प्रार्थना केली जाते.

सभादीपदान : स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी साक्षात् अग्नी स्वरूप पूज्य सद्गुरु माऊलींच्या सानिध्यात गव्हाच्या पिठाचा दिवा त्यात शुद्ध देशी तुपामध्ये माखलेली युग्म कापसाची वात घालून सभेमध्ये पूज्य सद्गुरूंना ओवाळून दान करावी. या विधीला सभादीपदान असे म्हणतात. 

श्री दत्त पद्मनाभ पीठ श्री क्षेत्र तपोभूमी आयोजित श्रावणी विधी, यज्ञोपवीत धारण-तर्पण विधी तथा नारीशक्तीद्वारा सभादीपदान रविवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ येथे संपन्न होणार आहे.


- वे. मू. अनुप शांताराम शेलार