सर्वच गोष्टी मोफत मागण्याऐवजी, काही वेळा आपल्या आणि राज्याच्या हितासाठी शुल्क लागू झाल्यास त्याचेही स्वागत व्हायला हवे. निश्चितच दोन्ही बाजूंच्या काठावरील नागरिकांना यात काही बाबतीत सूट असायला हवी. त्यांना एकरकमी पासही देता येऊ शकतो.
कोणतेही बदल करताना सुरुवातीला विरोध होतोच, पण त्याचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर तो विरोध हळूहळू मावळतो. गेली अनेक वर्षे गोव्यातील जलमार्गांवर सुरू असलेल्या फेरीबोटींमधून होणारा प्रवास किती कंटाळवाणा आणि त्रासदायक आहे, हे त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच माहीत आहे. काठावर बसून नुसते पाहणाऱ्यांना त्याची कल्पना नसेल. एखादे चारचाकी वाहन फेरीत आणणे आणि नंतर ते पुन्हा बाहेर काढणे, यात जोखीम आहेच. पण त्रासही फार. पूर्वी जुन्या फेरीबोटीने प्रवास करताना प्रवाशांना आधी फेरीची वाट पाहावी लागे आणि नंतर फेरीबोट किनाऱ्यावर कधी पोहोचेल याची प्रतीक्षा करावी लागे. जुन्या फेरीबोटींचा वेग कमी असल्यामुळे तसेच आकार लहान असल्यामुळे त्या वेळ आणि प्रवासी क्षमता या दोन्ही बाबतीत अपुऱ्या पडतात. काही फेरी मार्ग असे आहेत की, तिथे सकाळ-संध्याकाळ तुफान गर्दी उसळते. गोव्यातील जलमार्गांचे पर्यटकांनाही कौतुक वाटते. पण वेळ जास्त लागत असल्यामुळे प्रवाशांनाही कंटाळा येतो. या जुन्या फेरीबोटींच्या प्रवासाला पूर्णविराम देऊन नव्या बदलांना स्वीकारण्याचा निर्णय घेत, नदी परिवहन खात्याने राज्यातील सर्वात वर्दळीच्या आणि सतत प्रवासी ये-जा करणाऱ्या रायबंदर - चोडण जलमार्गावर रो-रो फेरी सेवा सुरू केली. सुरुवातीला हा काहीतरी नवीन प्रयोग म्हणून अनेकांनी विरोध केला. पण सेवा सुरू झाल्यानंतर या फेरींचे सर्वांनाच कौतुक वाटू लागले. कारण एका धक्क्यावरून दुसऱ्या धक्क्यापर्यंतचा प्रवास पाच मिनटांत पूर्ण होतो. पूर्वीच्या फेरीबोटींपेक्षा नव्या रो-रो फेरीबोटींमध्ये जास्त चारचाकी आणि दुचाकी सामावून घेण्याची क्षमता असल्यामुळे त्या सर्वच दृष्टीने फायद्याच्या ठरत आहेत. हा नवा प्रयोग असल्यामुळे, त्यातील त्रुटी समजून घेऊन, नवीन मार्गांवर अशा फेरीसेवा सुरू करताना सरकारनेही त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी संबंधित कंपनीला सूचना देणे अपेक्षित आहे.
सध्या रायबंदर-चोडण जलमार्गावरच दोन रो-रो फेरी सुरू केल्या आहेत. या फेरींमुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. गोव्यातील सगळ्याच जलमार्गांवर अशा प्रकारच्या फेरीबोटी सुरू होणे ही काळाची गरज आहे. कारण जुन्या फेरीबोटींमुळे वेळ वाया जात असल्यामुळे प्रवाशांना जलदगतीने प्रवास करण्यासाठी अशा नव्या सुसज्ज फेरीबोटींची गरज आहे. सध्या सुरू असलेल्या फेरींचा आढावा घेतल्यानंतर, अन्य जलमार्गांवर अशा फेरीबोटी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
सर्वांत आधी बेती-पणजी आणि दिवाडी - सापेंद्र जलमार्गावर अशा फेरीबोटी आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. बेती पंचायतीने बेती-पणजी मार्गावर अशी फेरीसेवा सुरू करण्यासाठी तसेच दिवाडी-सापेंद्र मार्गावर अशी सेवा सुरू व्हावी यासाठी नदी परिवहन खात्याकडे मागण्या आलेल्या आहेत. सध्या रायबंदर - चोडण मार्गावर दोन फेरीबोटी सुरू आहेत. पण प्रवासी जास्त होत असल्यामुळे त्या कमी पडतात. त्याच मार्गावर अजून किमान एक नवी फेरीबोट हवी. जलमार्गाचा प्रवास जलद व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी अशा प्रकारच्या फेरीबोटींची गरज आहे. गोव्यातील सर्वच जलमार्गांवर अशी रो-रो फेरीसेवा हवी. मात्र हे करताना नदी परिवहन खात्याच्या जुन्या फेरीबोटींवर असलेल्या कर्मचाऱ्यांचीही काळजी सरकारने घ्यावी लागेल.
पूर्वीच्या फेरीबोटी सुसज्ज नव्हत्या. नवीन फेरीबोटींमध्ये प्रवाशांसाठी वातानुकूलित आसन व्यवस्था, अधिक वाहने समावून घेण्यासाठी जागा, शौचालये यांसारख्या सुविधाही आहेत. शिवाय, प्रदूषण कमी होत असल्यामुळे अशा पर्यायांचे स्वागत व्हायला हवे. किंबहुना, गोव्यातील सर्वच जलमार्गांवर अशा जलदगतीने प्रवास करण्यास मदत करणाऱ्या फेरीबोटी सुरू होणे काळाची गरज आहे. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन अशा फेरीबोटींचा पर्याय सर्वांनीच स्वीकारायला हवा. यात वेळ वाचतो, शिवाय प्रदूषणही कमी होते. अशा सेवेसाठी सरकारने शुल्क लागू केले तरीही, वाचणाऱ्या वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन ते शुल्क भरण्याची तयारी ठेवायला हवी. सर्वच गोष्टी मोफत मागण्याऐवजी, काही वेळा आपल्या आणि राज्याच्या हितासाठी शुल्क लागू झाल्यास त्याचेही स्वागत व्हायला हवे. निश्चितच दोन्ही बाजूंच्या काठावरील नागरिकांना यात काही बाबतीत सूट असायला हवी. त्यांना एकरकमी पासही देता येऊ शकतो. पण अशा चांगल्या सेवा गोवेकरांना मिळायल्या हव्यात. तो नागरिकांचा हक्क आहे. फक्त, या सुविधा देताना सध्याच्या कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे हित जपले जावे.