अपघातांमुळे गोव्याचे दुहेरी नुकसान

वाहनचालकांकडून नियमभंग तर होतोच, शिवाय ज्या गोष्टी प्रशासकीय पातळीवर व्हायला हव्यात, तेथे अनास्था दाखवली जाते. खड्डेमय रस्ते, स्पष्ट दिशादर्शक फलक नसणे, रात्रीची पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे या गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरतात.

Story: संपादकीय |
11th July, 10:13 pm
अपघातांमुळे गोव्याचे दुहेरी नुकसान

गुरुवारी फोंडा तालुक्यात बेतोडा येथे झालेला अपघात असो किंवा बुधवारी गिरवडे येथील महामार्ग जंक्शनवर झालेला अपघात असो, यात बळी गेलेल्या गोमंतकीयांच्या कुटुंबांवर कोसळलेले संकट हे खरोखरच अवर्णनीय आहे. अपघाती मृत्यू अशी पोलीस खात्यात नोंद झालेली संख्या ही केवळ आकडेवारी नसून, गोव्यातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे. ही व्यवस्था निर्माण करणारे संबंधित खाते किंवा प्रशासकीय धोरण एवढेच याचे कारण नसून नियमभंग केल्याने स्वतः मृत्यू पावलेले अथवा दुसऱ्याचा जीव घेतलेले वाहनचालकही तितकेच जबाबदार आहेत. तसे पाहता, गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले राज्य असून देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे येतात. मात्र गेल्या काही वर्षांत गोव्यात रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढली आहे. अपघातांमुळे अनेक निष्पापांचे बळी जात आहेत, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या समस्येची गांभीर्याने दखल घेणे अत्यावश्यक आहे. कमावती व्यक्ती असो किंवा शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असो, त्यांचा बळी जाणे हे कुटुंबावरील मोठे संकट ठरत असते. उपलब्ध आकडेवारीनुसार अपघातांत निधन पावलेल्या निम्म्या व्यक्तींनी वयाची चाळीशीही ओलांडलेली नाही, हे अधिक वेदनादायक आहे. संसारात रमण्याच्या या वयात ज्यांचे प्राण गेले, त्यांना सर्वस्वी तेच जबाबदार होते, असे म्हणता येणार नाही. शिस्तीत वाहन चालविणाऱ्याच्या समोरून किंवा पाठीमागून येणारा दुसरा वाहनचालक जर बेशिस्त असेल, नियमभंगाची सवय त्याला जडली असेल, तर तो नाहक बळी घेतो, अशा व्यक्तींना कठोर शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. अपघात वाढल्यावर, त्यात असंख्य बळी गेल्यावर सरकार काही ठोस पावले उचलण्याची घोषणा करीत असते, त्याची कार्यवाही कितपत होते, याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. अपघातांमुळे प्राणहानी आणि राज्याची बदनामी असे दुहेरी नुकसान होत आहे.

पर्यटक आणि स्थानिक नागरिक अनेकदा वाहने वेगात चालवतात. गोव्यातील अरुंद रस्ते आणि वळणदार मार्गांवर वेगात गाडी चालवणे अपघातास आमंत्रण ठरते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे जीवावर बेतते, हे वेगळे सांगायला नको. आपल्या राज्यात मुक्तपणे दारू उपलब्ध आहे, त्यामुळे पर्यटक किंवा स्थानिक मद्यपान करून वाहन चालवतात, ज्यामुळे अपघात होतात. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मेसेज टायपिंग करण्याने वाहनचालकाचे लक्ष विचलित होते. वाहनांची खराब स्थिती व देखभालीचा अभाव हेही एक कारण असू शकते. अनेक वाहनांची ब्रेक प्रणाली, टायर, हेडलाईट्स नीट नसतात, त्यामुळे नियंत्रण सुटून अपघात होतो. वाहन परवाना नसलेल्या चालकांची संख्या वाढली आहे. विशेषतः दुचाकी किंवा चारचाकी भाड्याने घेणारे पर्यटक अनेकदा परवानाधारक नसतात. हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे, ओव्हरटेक करताना काळजी न घेणे हेही मुख्य कारण आहे. या शिवाय ज्या गोष्टी प्रशासकीय पातळीवर व्हायला हव्यात, तेथे अनास्था दाखवली जाते. खड्डेमय रस्ते, स्पष्ट दिशादर्शक नसणे, रात्रीची पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे या गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरतात.

वाहतूक पोलीस अधुनमधून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतात. खरे तर हे नियमित करण्याचे काम आहे. स्वतंत्र विभाग असल्याने तर हे सहज शक्य आहे. गोव्यातील अनेक ठिकाणी असलेली सिग्नल व्यवस्था कधी बंद पडेल याचा नेम नाही. मेरशी जंक्शन, पर्वरी येथील सिग्नल व्यवस्था बहुतेक वेळा बंद असते. अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याने इतर कामांसाठी ते उपलब्ध नसतात. अनेक वेळा सिग्नल व्यवस्था कुचकामी ठरल्याने ती वारंवार बदलणे हा तर उघड आर्थिक गैरप्रकार मानावा लागेल. शाळा, कॉलेज, पर्यटक स्थळांवर वाहतूक नियमांचे महत्त्व सांगणाऱ्या मोहिमा राबवणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, ब्रेथ अॅनालायझर तपासणी वाढवणे व गुन्हेगारांवर दंड व परवाना रद्द करण्याची कारवाई करणे, अशी पावले तातडीने उचलावी लागतील. खासगी वाहन भाड्याने देणाऱ्या एजन्सींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रमुख चौकांत सीसीटीव्ही बसवून अपघातांची कारणमीमांसा करता येईल. गोव्यातील वाढते रस्ते अपघात ही गंभीर समस्या असून केवळ वाहतूक पोलिसांवर जबाबदारी टाकून चालणार नाही. शासन, पोलीस यंत्रणा, पर्यटक, स्थानिक नागरिक व वाहन कंपन्या यांनी एकत्रितपणे जबाबदारी घेतली तरच ही परिस्थिती सुधारू शकते. सुरक्षित वाहतूक ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. तरच दरदिवशी एक या सरासरीने जाणारे मानवी बळी रोखणे शक्य होणार असून प्रशासकीय पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात यावी.