इंस्टाग्रामवर व्हायरल झालेली स्वतःची रील पाहिल्यानंतर एका महाविद्यालयीन तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती
बंगळुरु : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांचे व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय शूट करून ते इंस्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या २६ वर्षीय विकृत तरुणाला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. गुरदीप सिंग असे या आरोपीचे नाव असून तो हॉटेल मॅनेजमेंट पदवीधर आहे व सध्या बेरोजगार आहे. तो केआर पुरम परिसरात भावासोबत राहतो.
बनशंकरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण होसूर यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला. गुरदीपने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकूण ४५ व्हिडिओ रील स्वरुपात पोस्ट केले होते. हे सर्व व्हिडिओ महिलांच्या संमतीशिवाय शूट केले गेले असून स्लो मोशनमध्ये अश्लील पद्धतीने सादर करण्यात आले होते. त्याच्या अकाऊंटला सुमारे १० हजार फॉलोअर्स होते.
एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने या अकाऊंटवर पोस्ट झालेल्या स्वतःच्या व्हिडिओबाबत आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, चर्च रस्त्यावर तिचा व्हिडिओ शूट करून परवानगी न घेता इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला. त्या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर अश्लील संदेश येऊ लागले. संबंधित अकाऊंट होल्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही, असेही तिने नमूद केले.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि १२ जून रोजी संबंधित इंस्टाग्राम हँडल शोधून काढले. त्यानंतर बुधवारी गुरदीप सिंगला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिते अंतर्गत पाठलाग करणे व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट बंद करण्यासाठी न्यायालयीन परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी देखील या प्रकरणाची नोंद घेतली असून पोलिसांना याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.