राधिकाला रील्स बनवण्याची होती आवड; मुलीने सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या गैरसमज, वाढला होता मानसिक तणाव.
गुरुग्राम : संपूर्ण जगात विंबल्डन स्पर्धेची चर्चा सुरू असतानाच, भारतातील टेनिस विश्वातून मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील टेनिसपटू राधिका यादव हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हा खून तिच्या वडिलांनीच केला आहे. ही घटना गुरुग्राममधील सुशांत लोक फेज-२ येथील उच्चभ्रू वसाहतीतील फ्लॅटमध्ये घडली.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास, २५ वर्षीय राधिका स्वयंपाकघरात असताना तिच्या वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. तिच्या कमरेत तीन गोळ्या लागल्या. घटनेनंतर राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस चौकशीत दीपक यादव यांनी गुन्ह्याची कबुली दिली. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, दीपकला गावातील लोक टोमणे मारायचे. मुलीच्या कमाईवर जगणारा.. म्हणून हिणवायचे. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक तणाव होता. त्यांना राधिकाच्या सोशल मीडियावरच्या रील्स आणि तिच्या टेनिस अकॅडमीमुळे समाजात आपली प्रतिष्ठा घसरत असल्याचे वाटत होते घटनेनंतर सुरुवातीला कुटुंबीयांनी राधिकाने आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी केल्यावर, दीपकने गुन्हा कबूल केला.
दीपक यादव यांना अटक करण्यात आली असून, ते पोलीस कोठडीत आहेत. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण असून, टेनिस क्षेत्रातील आणि सोशल मीडियावर राधिकाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटत आहेत. एका वडिलांकडून मुलीची झालेली ही क्रूर हत्या समाजाला अंतर्मुख करणारी ठरत आहे.
राधिकाची टेनिस कारकीर्द
राधिका यादव ही राज्य व राष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळत होती. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या नोंदीनुसार, तिने काही व्यावसायिक सामने खेळले होते. मात्र, खांद्याच्या दुखापतीनंतर तिने स्वतःची टेनिस अकॅडमी सुरू केली होती आणि सोशल मीडियावर सक्रिय होती.