चेटकीण असल्याचा संशय घेऊन एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

बिहारमधील घटना : जमावाची काठ्यांनी मारहाण, दोघांना अटक


16 hours ago
चेटकीण असल्याचा संशय घेऊन एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पूर्णिया : बिहारमधील पूर्णियामध्ये एका महिलेवर ती चेटकीण असल्याचा संशय घेऊन जमावाने तिच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पाचही जणांना जीवंत जाळल्याचे अटक केलेल्या एका संशयिताने पोलिसांना सांगितले. हा गुन्हा रविवारी रात्री घडला. या प्रकरणाची माहिती सोमवारी मिळाली.
गावातील काही लोकांनी बाबू लाल ओरांव यांच्या पत्नी सीता देवी यांना चेटकीण म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. रविवारी रात्री १० वाजता अचानक ५० लोक घरात आले आणि त्यांनी माझी आई सीतादेवी यांना बांबूच्या काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना चेटकीण म्हटले. त्या लोकांनी माझ्या कुटुंबाला बेदम मारहाण केली, असे बाबू ओरांव यांचा मुलगा सोनूने सांगितले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी नकुलने सांगितले की, भांडणानंतर पाचही जणांवर डिझेल ओतून जिवंत जाळण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुफस्सिल पोलीस स्टेशन आणि जवळच्या तीन पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुफस्सिलचे एसएचओ उत्तम कुमार म्हणाले की, या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
जीवंत जाळले की, मृत्यूनंतर याचा तपास सुरू
पोलीस अधिकारी पंकज शर्मा म्हणाले की, पूर्णिया हे उराव जातीचे गाव आहे. या गावातील ५ जणांना मारहाण करून जाळण्यात आले. त्यांना जिवंत जाळण्यात आले की मृत्यूनंतर जाळण्यात आले याचा तपास सुरू आहे. १५ वर्षीय सोनूने त्याच्या आजीला माहिती दिली. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली. या घटनेत संपूर्ण गावाचा सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. छापेमारी सुरूच आहे.

हेही वाचा