दहा वर्षांत २२ टक्क्यांनी वाढ : २०१५ मध्ये ३,८०४, तर २०२४ मध्ये ४,६६३ जणांनी गमावला जीव
गोवन वार्ता
पणजी : बदलती जीवनशैली, सकस आहाराचा अभाव, व्यसनाधीनता अशा विविध कारणांमुळे राज्यात हृदयविकाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०१५ ते २०२४ या दहा वर्षांत हृदयविकारामुळे ४४ हजार १०१ व्यक्तींचा मृत्यू झाला. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ३६७ आणि दिवसाला सरासरी १२ जणांचा मृत्यू झाला. २०१५ च्या तुलनेत २०२४ मध्ये हृदयविकारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २२.५८ टक्क्यांनी वाढली.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात वरील कालावधीत विविध वैद्यकीय किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. वर्षनिहाय पाहता हृदयविकारामुळे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. २०१५ मध्ये हृदयविकारामुळे ३,८०४ लोकांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये ही संख्या ४,६६३ झाली. वरील दहा वर्षांच्या कालावधीत २०२१ मध्ये हृदयविकारामुळे सर्वाधिक ५,५६८ मृत्यू झाले. राज्यात २०१६ मध्ये हृदयविकाराने ४,१०० जणांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये ४०१३, २०१८ मध्ये ४०२५, २०१९ मध्ये ४५८६, २०२० मध्ये ४३९२, २०२२ मध्ये ४३६१, तर २०२३ मध्ये ४५८९ जणांचा मृत्यू झाला. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराने मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दहा वर्षात २३ हजार २४९ रुग्ण (५३ टक्के) पुरुषांचे, तर २० हजार ८५२ (४७ टक्के) महिलांचे मृत्यू झाले.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांची तुलना केल्यास ग्रामीण भागात हृदयविकाराने आणि हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. २०२४ मध्ये गोव्याच्या शहरी भागात हृदयविकारामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३,४८६ (७४.७५ टक्के) मृत्यू हे ग्रामीण भागात झाले होते, तर १,१७७ (२५.२४ टक्के) मृत्यू हे शहरी भागातील होते.
गोव्यात हृदयविकाराने होणारे मृत्यू हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या पाच वर्षांत हार्टअटॅकने मृत्यू झालेल्या व्यक्तींची वैद्यकीय पार्श्वभूमी तपासून त्यांना इतर कोणते आजार होते का, यावर अभ्यास झाला पाहिजे. असा अभ्यास झाला तरच नेमका आणि खरा आकडा समजू शकेल.
_ डॉ. शेखर साळकर
२०२१ मध्ये सर्वाधिक मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, वरील दहा वर्षांच्या कालावधीत २०२१ मध्ये हार्टअटॅकमुळे सर्वाधिक ५,५६८ जणांचा मृत्यू झाला होता. यादरम्यान कोविडची लाट आली होती. यानंतर २०२४ मध्ये हृदयविकारामुळे दहा वर्षातील दुसऱ्या अधिक मृत्यूंची नोंद झाली.