अहवालात वीज खात्याने केली शिफारस
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वीजपुरवठा खंडित केलेला असताना ट्रान्स्फॉर्मर वा वीज वाहिन्यांत रिव्हर्स करंट येणे बंद होण्यासाठी जनरेटर, इन्व्हर्टर यांना स्वतंत्र स्वीच बसवण्यासह अन्य सुरक्षेचे उपाय करणे बंधनकारक आहे. लाईनमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वीज खात्यान हा निर्णय घेतला आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
मे महिन्याच्या अखेरीस होंडा येथे दुरुस्ती काम सुरू असताना लाईनमन चंद्रू गावकर (मार्ले-सत्तरी) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. शॉक लागण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी खात्याने अभियंत्यांकडून चौकशी करून अहवाल तयार केला. शॉक लागण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी रिव्हर्स करंट हे एक कारण आहे. या अहवालात लाईनमनच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. शिफारशीनंतर जनरेटर, इन्व्हर्टर यांची नोंदणी व सुरक्षेचे उपाय सक्तीचे केल्याचे वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
दुकाने, गॅरेज तसेच घरांतही आता जनरेटर वा इन्व्हर्टरचा वापर होतो. अर्थिंग व सुरक्षेचे उपाय नसल्याने जनरेटर वा इन्व्हर्टर सुरू केल्याबरोबर रिव्हर्स करंट वाहिन्यांत येतो. हा धोका दूर करण्यासाठी वेगळा स्वीच, अर्थिंग सक्तीचे असेल.
होंडा येथे जनरेटरमधून रिव्हर्स करंट आल्यानेच वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही काम करणाऱ्या लाईनमनला शॉक बसला. लाईनमनच्या मृत्यूचे हेही एक कारण आहे. त्यामुळे सुरक्षेचे उपाय म्हणून खात्याने जनरेटर, इन्व्हर्टरसाठी नोंदणी आणि सुरक्षेचे उपाय सक्तीचे केले आहेत.
_ सुदिन ढवळीकर, वीजमंत्री