चार जखमी : दोघे गंभीर
आंबोली : पंढरपूर येथून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गोवा येथील भाविकांच्या कारला आजरा तालुक्यातील घाटकरवाडी, कित्तवडे येथे अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले असून, त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
हातुर्ली, मये, डिचोली, गोवा येथील भाविक सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पायी वारीने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणीही देवदर्शन घेतले. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे सर्व भाविक पंढरपूरहून आपल्या गाडीने गोव्याला आपल्या गावी परत येत असताना, आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील कित्तवडे फाट्यावर त्यांच्या व्हॅगनआर कारला अपघात झाला. समोरून भरधाव येणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्याने व्हॅगनार चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे व्हॅगनार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन पलटी झाली.
या अपघातात रिमा रत्नाकर चोडणकर (वय ५७, रा. हातुर्ली, मये, डिचोली, गोवा) आणि स्नेहल शिवराम नागवेकर (वय ६२) यांना गंभीर दुखापत झाली. तर दिव्या देवानंद कवठणकर (वय ४८) आणि शिवराम नारायण नागवेकर (वय ६७) (सर्व रा. हातुर्ली, मये, डिचोली, गोवा) या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
सर्व जखमींना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील आरोग्य अधिकारी डॉ. अदिती पाटकर आणि डॉ. महेश जाधव यांनी अपघातातील जखमींना प्रथमोपचारानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.