एएमएफआयचा अहवाल : गोव्याची प्रतिव्यक्ती गुंतवणूक देशात सर्वाधिक, एकूण गुंतवणूक ३८ हजार कोटींवर
पणजी : मागील काही महिन्यांत गोव्यासह संपूर्ण देशात शेअर बाजारातील गुंतवणूक कमी झाली होती. मात्र, नवीन आर्थिक वर्षापासून अशा गुंतवणुकीत पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिल २०२५ अखेरपर्यंत गोव्यातून म्युच्युअल फंडमध्ये ३७ हजार कोटी रुपये गुंतवण्यात आले होते. मे २०२५ अखेरीस त्यात १६०० कोटी रुपयांची वाढ होऊन ती ३८ हजार ६०० कोटी रुपये झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडिया (एएमएफआय) या संस्थेच्या अहवालानुसार ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, गोव्यातील मे महिन्यात म्युच्युअल फंडमधील प्रति व्यक्ती गुंतवणूक देखील वाढली आहे. एप्रिल २०२५ अखेरीस गोव्यात प्रति व्यक्ती २ लाख ३७ हजार ६४० रुपये म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात आले होते. मे २०२५ अखेरीस त्यात वाढ होऊन ती प्रति व्यक्ती २ लाख ४७ हजार ८९० रुपये झाली आहे. गोव्यातील प्रति व्यक्ती गुंतवणूक ही देशात सर्वाधिक आहे. या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. येथून प्रती व्यक्ती २ लाख ३६ हजार २९० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. केंद्र शासित प्रदेशांचा विचार करता दिल्ली येथील प्रति व्यक्ती म्युच्युअल गुंतवणूक सर्वाधिक म्हणजेच २ लाख ८८ हजार ८४० रुपये इतकी आहे.
अहवालानुसार, मे २०२५ अखेर पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यातील एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक २८ हजार ६१४ कोटी रुपये एक्विटी स्कीममध्ये गुंतवण्यात आले आहेत. ४ हजार २०७ कोटी डेबिट ओरियेंटेड स्कीममध्ये, ८४३.१९ कोटी लिक्वीड स्कीममध्ये तर सुमारे ५ हजार कोटी रुपये अन्य स्किममध्ये गुंतवले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता मे २०२५ अखेरीस म्युच्युअल फंडमध्ये सुमारे ७२ लाख कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत.
राज्यातील २.५२ लाख लोकांनी केली गुंतवणूक
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएससी) अहवालानुसार, एप्रिल २०२५ अखेरीस गोव्यातील २.५२ लाख लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. मागील सहा महिन्यांत गोव्यात महिन्याला सरासरी अडीच हजाराहून नवीन गुंतवणूकदार तयार झाले आहेत. मार्च २०२५ अखेरीस गोव्यातील एकूण म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांपैकी ३२.४ गुंतवणूकदार या महिला होत्या. महिला गुंतवणूकदारांची राष्ट्रीय सरासरी २४.३ टक्के इतकी होती.