नीरज चोप्राने पटकावले पॅरिस डायमंड लीग २०२५ चे विजेतेपद

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd June, 12:41 am
नीरज चोप्राने पटकावले पॅरिस डायमंड लीग २०२५ चे विजेतेपद

पॅरिस : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पॅरिस येथे पार पडलेल्या डायमंड लीग २०२५ स्पर्धेच्या फेरीत नीरजने ८८.१६ मीटर भालाफेक करत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत जर्मनीचा नामवंत खेळाडू जूलियन वेबर आणि ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत नीरजने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा झेंडा फडकावला.
पहिल्याच प्रयत्नात ठोकली आघाडी
नीरजने स्पर्धेतील आपला पहिलाच थ्रो ८८.१६ मीटर इतका लांब फेकला आणि त्या थ्रोच्या जोरावर त्याने स्पर्धेची आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. ही कामगिरी त्याच्या हंगामातील सर्वोत्तम असल्याचे सांगितले जात आहे.
वेबरवर घेतला बदला
नीरजचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या जूलियन वेबरने ८७.८८ मीटर थ्रो करत दुसरे स्थान पटकावले. उल्लेखनीय म्हणजे, वेबरने याआधीच्या दोहा लेगमध्ये नीरजचा पराभव केला होता. मात्र, पॅरिसमध्ये नीरजने त्याचा वचपा घेत विजेतेपद आपल्याकडे खेचून आणले. ब्राझीलच्या लुइस मॉरिसियो दा सिल्व्हा याने ८६.६२ मीटर थ्रो करत तिसरे स्थान पटकावले.
अँडरसन पीटर्सची निराशाजनक कामगिरी
पूर्वी नीरजचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जाणारा अँडरसन पीटर्स या वेळी अपयशी ठरला. त्याच्या ५ प्रयत्नांपैकी सर्वोत्तम थ्रो फक्त ८०.२९ मीटर इतकाच नोंदवला गेला. त्याची सुरुवातही ७७.८९ मीटर या सुमार थ्रोने झाली होती, ज्यामुळे तो क्रमवारीत मागेच राहिला.
अंतिम फेरी झ्युरिकमध्ये
या हंगामाच्या डायमंड लीगची अंतिम फेरी २७-२८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील झ्युरिक शहरात होणार आहे. या विजयानंतर नीरजचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून तो अंतिम फेरीसाठी सज्ज होत आहे. नीरज चोप्रा याची पुढील स्पर्धा २४ जून रोजी चेक प्रजासत्ताकमधील ‘ओस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक २०२५’ येथे होणार आहे. त्यानंतर तो ५ जुलै रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या स्पर्धेत देखील भाग घेणार आहे.