१५ दिवस चालणार कामकाज
पणजी : गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बोलावले आहे. राज्यपालांनी शुक्रवारी (दि. २०) हा आदेश जारी केला. हे अधिवेशन ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार असून, एकूण १५ दिवसांचे कामकाज होणार आहे.
राज्याच्या आठव्या विधानसभेचे हे दहावे सत्र असून, मागील दोन अल्पकालीन अधिवेशनांमध्ये चर्चेसाठी अपुरा वेळ मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या विविध योजनांच्या मागण्यांवर चर्चा होणार असून, काही महत्त्वाची विधेयके देखील सरकारकडून मांडली जाण्याची शक्यता आहे.
पर्वरी येथील विधानभवन परिसरात अधिवेशनाच्या पूर्वतयारींना वेग आला असून, प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अधिवेशनात राज्यातील बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, अपघात, तसेच खाण लिलावासारख्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षीचे पावसाळी अधिवेशन १८ दिवसांचे होते. यंदाचे अधिवेशन १५ दिवसांचे करण्यात आले आहे. वर्षागणिक अधिवेशनाचा कालावधी कमी होत आहे. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याने ते चर्चेला घाबरत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था साफ बिघडलेली आहे. अधिवेशनात सरकारचे अपयश आम्ही सिद्ध करू.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते