आधी सत्ता, मग सत्तेवरच टीका... शेवटी सत्तेबाहेर!

ज्या फोंडा, शिरोडा, सावर्डे, सांगे अशा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार जिंकण्यासाठी काम केले होते, आज त्यापैकी कोणीच गावडे यांच्या मदतीला आला नाही किंवा वादही मिटवण्यासाठी मध्यस्थी केली नाही. कारण गावडे यांनी सरकारच्या नेतृत्वावरच अविश्वास दाखवला, जो कोणालाच मान्य नाही.

Story: उतारा |
21st June, 10:55 pm
आधी सत्ता, मग सत्तेवरच टीका... शेवटी सत्तेबाहेर!

 थेट मुख्यमंत्र्यांच्या खात्यातील कारभारावर टीका करून वाद निर्माण केल्यानंतर गोविंद गावडे यांची गच्छंती निश्चित होती. त्यासाठी पंचवीस दिवस लागले. २५ मे रोजी प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यात 'देवाणघेवाण' झाल्यानंतरच फायली मंजूर होतात, असा आरोप केला होता. मुळात आदिवासी कल्याण खात्यात सभापती रमेश तवडकर यांचा हस्तक्षेप होतो, असा त्यांचा समज होता आणि त्यातूनच त्यांनी हे आरोप केले होते. त्या आरोपांमुळे मुख्यमंत्री दुखावले गेले. भाजपलाही हे अनपेक्षित होते. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने, मुख्यमंत्री नाराज होणे स्वाभाविक होते. भाजपने त्या प्रकरणाची दखल घेऊन गोविंद गावडे यांना बोलावून घेतले. घडल्या प्रकाराची माहिती घेऊन त्यांनाही बाजू मांडण्याची संधी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, विद्यमान उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर या सर्वांनीच गावडे यांच्या विधानानंतर आश्चर्य व्यक्त करून गंभीर प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीही व्यक्त झाले. सर्वांनीच गावडे यांच्यावर कारवाई होईल असे स्पष्ट केल्यामुळे त्यांचे मंत्रिपद जाणार हे निश्चित झाले. शेवटी पंचवीस दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांनी गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवले. त्यांच्याकडील कला अकादमी, राजीव गांधी कला मंदिर अशा साऱ्याच संस्था काढून घेतल्या. गोविंद गावडे एकाकी पडले. एका मागास समाजातून वर येणारा नेता आपल्याच एका चुकीमुळे 'वाळीत टाकल्याच्या स्थितीत' आहे. मात्र, हेही विसरून चालणार नाही की हेच गोविंद गावडे प्रियोळसह शिरोडा, केपे, सांगे, फोंडा, मये, सावर्डे, कुंभारजुवा, सांत आंद्रे अशा अनेक भागांत, जिथे आदिवासी समाजाचे बहुसंख्य मतदार आहेत, त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात भाजपच्या उमेदवारांसाठी मदतीला धावले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मित्र म्हणून ते नेहमी त्यांच्यासोबत उभे राहिले. आपण दोघेही मित्र आहोत असा त्यांचाही दावा आहे. मुख्यमंत्र्यांना त्रास देणाऱ्या मंत्र्यांसोबत गावडे यांनी आपले सूत जुळवले नाही. त्यांच्या या मैत्रीत गावडे यांची वागणूक अडथळा ठरली. मागे एकदा एका अधिकाऱ्याशी गावडे यांनी साधलेल्या संवादाची एक फोन रेकॉर्डींग व्हायरल झाली होती. त्यातही गावडे यांनी 'जाऊन सांग मुख्यमंत्र्यांना' असे रागाच्या भरात म्हटले होते. त्यावेळीही प्रकरण गाजले पण ताणले नव्हते. यावेळी जाहीर सभेत गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यावर टीका करून मुख्यमंत्र्यांचा आणि पक्षाचा रोष ओढवून घेतला. २०१७ मध्ये प्रथमच आमदार होऊन थेट मंत्रीपद मिळवणारे गोविंद गावडे गेली आठ वर्षे मंत्रीपदी होते. २०१७ मध्ये गोविंद गावडे यांनी पर्रीकरांच्या गटात येऊन सत्तेत येण्याचा मार्ग पत्करला. गावडे पर्रीकरांच्या तर त्यावेळी प्रसाद गावकर हे आधी काँग्रेसच्या संपर्कात राहिले. ज्यांचे सरकार स्थापन होईल तिथे दोघांनाही सत्तेत सहभागी होता येईल याची व्यवस्था करावी असे ठरले होते. भाजपने बाजी मारली. गोविंद गावडे पर्रीकरांसोबत होते त्यामुळे साहजिक ते मंत्री झाले. त्यानंतर प्रसाद गावकर भाजपच्या गटात आले. पर्रीकरांनी त्यांना 'तू यायला उशीर केला' असे म्हणत वनविकास महामंडळ देऊन बोळवण केली. एक आदिवासी नेता मंत्री झाला तर दुसरा आदिवासी नेता त्याचवेळी फसला होता. गावडे यांनी पर्रीकरांशी चर्चा करून प्रसाद गावकर यांच्यासाठी एखादे चांगले महामंडळ मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा होता. तसे झाले नाही. प्रसाद गावकर २०२२ मध्ये पराभूत झाले. त्याच वर्षी गोविंद गावडे भाजपात आले आणि पुन्हा निवडून येऊन प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये क्रीडा, कला संस्कृती, ग्राम विकास सारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री झाले. गावडे जर सावंत यांच्यासोबत २०२७ पर्यंत राहिले असते तर आदिवासींना खूश करण्यासाठी २०२७ च्या निवडणुकीनंतर भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रीही केले असते. कारण २०२७ पर्यंत आदिवासी मागत असलेले राजकीय आरक्षण मिळणे कठीण आहे. त्यामुळे जर २०२७ मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आली असती तर आदिवासींच्या आरक्षणाच्या मागणीची नुकसान भरपाई म्हणून गावडे यांचा उपमुख्यमंत्रीपदासाठी निश्चितच विचार झाला असता. असे असले तरी प्रथमच निवडून येऊन नशिबात मंत्रीपद घेऊन आलेले गोविंद गावडे आठ वर्षे मंत्री राहिले. अशी संधी यापूर्वी कुठल्याच आदिवासी नेत्याला गोव्यात मिळाली नव्हती.

यश पचवता येणेही तेवढेच गरजेचे आहे. गावडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये जी वागणूक काही लोकांना दिली, त्यातून त्यांच्याविषयी गैरसमजही अनेक पसरले. वारंवार आपल्याच पक्षातील किंवा युतीतील नेत्यांसोबत शत्रुत्व घेतले ते त्यांच्या प्रतिमेलाही मारक ठरले आहे. आपण करतो तेच योग्य असे काही नेत्यांना वाटते. गावडे यांनाही तसे वाटले नसेल असे म्हणता येणार नाही. कला संस्कृती मंत्री म्हणून तवडकर यांच्याशी संबंधित संस्थांची बोळवण करणे, आपल्याला हवे त्यांनाच लाभ देणे, बाहेरचे सोडाच त्यांनी प्रियोळ मतदारसंघातील आपल्याशी चांगले संबंध नसलेल्या लोकांनाही सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी अडथळे आणले असे आरोप अनेकदा झाले. दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक, दिगंबर कामत, रामराव देसाई यांच्याकडे कला संस्कृती खाते असताना कधी पक्षपातीपणा झाला नाही. गावडे यांच्या कारकिर्दीत या पक्षपातीपणाचे आरोप अनेकदा वेगवेगळ्या लोकांकडून झाले. सरकारमधील घटकांशी ज्या प्रकारचे वाद आहेत तसेच वाद बाहेर कलाकार आणि कला संस्थांशी. सरकारनेही यात हस्तक्षेप केला नाही. मुख्यमंत्र्यांचे मित्र म्हणून की काय, त्यांच्याकडून कला संस्कृती खाते किंवा कला अकादमीही काढून घेतली गेली नाही. आता मुख्यमंत्र्यांच्याच शेपटीवर पाय पडला त्यावेळी मंत्रीपद आणि अध्यक्षपदही गमवावे लागले.

 कला अकादमीच्या दुरुस्तीवरून झालेल्या वादात गावडे यांनी आपल्यावर अनेकदा विरोधक आणि कलाकारांचा रोष ओढवून घेतला. कला अकादमीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला सोडून विरोधकांनी गोविंद गावडे यांना लक्ष्य केले. कंत्राटदाराकडे बोट दाखवून गावडे यांना दूर राहता आले असते पण मंत्री म्हणून गावडे यांच्यावरच सर्व आरोप झाले. त्यांनीही ते ओढवून घेतले. त्याच विषयावरून अनेकदा त्यांना ट्रोलही करण्यात आले. वादापासून दूर राहण्यापेक्षा वाद स्वतःवर ओढवून घेऊन गावडे यांनी नेहमी आपल्या अडचणी वाढवल्या. अनेकदा वादग्रस्त विधाने करून ट्रोल झाले. सरकारमध्ये अनेकजण आहेत जे वारंवार वादग्रस्त विधाने करतात, ज्यांची वागणूकही वादग्रस्त आहे. टार्गेट मात्र नेहमी गावडे झाले. शेवटी पक्षानेही त्यांना सहानुभूती दाखवली नाही किंवा मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर आरोप केल्यानंतर आपण चुकून तसे बोललो असेही जाहीरपणे त्यांनी मान्य केले नाही. आदिवासी संघटनांची प्रतिनिधी संस्था असलेल्या उटाची मध्यस्थी असो किंवा गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट असो किंवा गोविंद गावडे-दामू नाईक भेट. कुठल्याच बैठकीत त्यांनी केलेल्या आरोपांमुळे तयार झालेला वाद शमला नाही. आपल्या बोलण्यामुळे खुर्ची गमावण्याची वेळ गावडे यांच्यावर आली.

आता गावडे एकाकी पडले आहेत. त्यांनी निवडणुकीत ज्या फोंडा, शिरोडा, सावर्डे, सांगे अशा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार जिंकण्यासाठी काम केले होते, आज त्यापैकी कोणीच गावडे यांच्या मदतीला आला नाही किंवा वादही मिटवण्यासाठी मध्यस्थी केली नाही. कारण गावडे यांनी सरकारच्या नेतृत्वावरच अविश्वास दाखवला, जो कोणालाच मान्य नाही. हा वाद मध्यस्थीने मिटवता आला असता. मुख्यमंत्र्यांची नाराजी दूर करताही आली असती. पण त्या मध्यस्थीसाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. सर्वांनाच आपल्या पदाची चिंता आहे, हे त्याचे कारण असू शकते.

पुढची कृती ठरवण्यासाठी गावडे यांनी रविवार २२ जून रोजी कार्यकर्त्यांची सभा बोलावली आहे. भाजप सोडण्याबाबत चर्चा आहेत. गावडे सध्यातरी असा निर्णय घेण्याची शक्यता नाही. २०२७ मध्ये मात्र विरोधकांच्या साथीला गेले, तर निश्चितच भाजपसाठी ते त्रासदायक ठरू शकते. त्यापूर्वी भाजप गावडे यांच्याबाबतची असलेली नाराजी दूर करते की त्यांना पक्ष सोडून जाऊ देते ते पुढील काळ सांगेल. गोविंद गावडे यांना दूर केल्यानंतर भाजपने लगेच रमेश तवडकर यांना जवळ केले आहे. त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली तर आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम वाढविण्यासाठी तवडकर यांना जबाबदारी दिली जाऊ शकते. तवडकर आणि गावडे यांच्यातील विस्तव जात नाही. त्यामुळे यापुढे किमान या दोन नेत्यांमधील राजकारण प्रकर्षाने दिसेल.

(लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)


- पांडुरंग गांवकर

९७६३१०६३००