गोविंद गावडेंकडून कला अकादमीही गेली

नव्या अध्यक्षाची नियुक्ती लवकरच : नव्या मंत्र्याचा शपथविधी, खाते बदलही होणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th June, 01:01 am
गोविंद गावडेंकडून कला अकादमीही गेली

पणजी : मंत्रिपदावरून हटवण्यात आलेले गोविंद गावडे यांचे कला अकादमीचे अध्यक्षपदही गेले आहे. कला व संस्कृती खात्याचा मंत्री हाच कला अकादमीचा अध्यक्ष असतो. सरकारी आदेशाप्रमाणे कला संस्कृती मंत्री गावडे हे कला अकादमीचे अध्यक्ष होते. मंत्रिपद गेल्यामुळे त्यांचे अध्यक्षपदही गेले आहे. दरम्यान, सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नव्या अध्यक्षाची नियुक्ती लवकरच होणार आहे.

आदिवासी कल्याण खात्यावर टीका करणाऱ्या मंत्री गोविंद गावडे यांना बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शिफारसीनंतर त्यांना त्या पदावरून काढून टाकण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला. आता नवीन मंत्री कोण असेल आणि शपथविधी कधी होणार, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, नवीन मंत्र्याचा शपथविधी लवकरच हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून नवीन मंत्र्याविषयी मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. त्यामुळे नवीन मंत्री तसेच शपथविधी समारंभाबद्दलचा ‘सस्पेन्स’ कायम आहे. 

कला आणि संस्कृती खात्याच्या मंत्र्याकडेच कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा ताबा दिला जातो. गावडे कला आणि संस्कृती मंत्री होते. त्यामुळे कला अकादमीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. त्यांच्याच कार्यकाळात कला अकादमीची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी कला अकादमीची नूतनीकरण निविदा आणि कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप कलाकार आणि विरोधक दोघेही करत होते. दरम्यान, आता त्यांच्याकडे कला आणि संस्कृती मंत्रिपद नसल्याने त्यांच्याकडील कला अकादमीचे अध्यक्षपद जाणे स्वाभाविक होते. 

दरम्यान, गावडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याविषयी आमदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी गावडे यांच्या कला आणि संस्कृती मंत्री म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. तर मंत्री म्हणून कोणाला ठेवायचे किंवा हटवायचे हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार असल्याचे महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले की, इतर पक्षांतून भाजपमध्ये सामील झालेल्यांनी पक्षाची शिस्त आणि विचारसरणी स्वीकारणे बंधनकारक आहे. पक्ष शिस्तीचे उल्लंघन किंवा बेजबाबदार विधाने केल्यास कारवाई अटळ आहे. मंत्री आणि आमदारांसह सर्वांच्या कामगिरीवर पक्षाचे लक्ष असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन मंत्रिपदासाठी दिगंबर कामत आघाडीवर
गोविंद गावडे यांच्या मंत्रिपदामुुळे रिक्त झालेल्या पदासाठी विविध नावे चर्चेत आहेत. यामध्ये सभापती रमेश तवडकर, कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची नावे आघाडीवर असली तरी दिगंबर कामत यांचे पारडे जड आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम आमदार कामत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बेशिस्तीला पक्षात थारा नाही : दामू नाईक
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या शिस्तीवर भर दिला. ते म्हणाले, पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांच्यावर पक्ष नेतृत्वाचे सतत लक्ष असते. पक्षात बेशिस्तीला थारा नाही. जे बेशिस्त आहेत आणि पक्षाच्या विचारसरणीशी प्रामाणिक व निष्ठावान नाहीत, त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई केली जाईल.

हेही वाचा