गोव्यातील तरुणांची सावंतवाडीत दादागिरी

पर्यटकांशी वादानंतर पोलिसांशीही झटापट : कारला बाजू देण्यावरून वाद

Story: कोकणसाद। वृत्तसेवा |
20th June, 12:42 am
गोव्यातील तरुणांची सावंतवाडीत दादागिरी

सावंतवाडी : आंबोली घाटातील रस्त्यावर कारला साईड देण्याच्या रागातून दुचाकीवरून आलेल्या गोव्यातील पर्यटकांनी इन्सुली येथील कार सावंतवाडीत अडवून दमदाटी करून वाद घातला. त्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्यांच्यासह कारमधील पर्यटकांनाही सावंतवाडी पोलीस स्थानकात आणण्यात आले. तेथेही गोव्यातील पर्यटकांनी पुन्हा कारमधील पर्यटकांशी झटापट सुरू केली.

कार चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गोवा येथील १३ ते १४ युवा पर्यटक दुचाकीने आंबोलीत आले होते. तर, इन्सुली व बांदा येथील पाच पर्यटक कारने आंबोलीत आले होते. पर्यटनाचा आनंद घेऊन कारमधील पर्यटक सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना घाटात वाहतूक कोंडी झाल्याने कार चालकाने तेथे असलेल्या दुचाकी चालकांना कारला बाजू द्या, माझी कार सुटू शकते असे सांगितले. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग केला. एका दुचाकीस्वाराने कारच्या काचेवर हेल्मेट मारून नुकसान केले. रस्त्यावर वाद नको म्हणून इन्सुली बांदा येथील पर्यटक सावंतवाडीकडे जाण्यास निघाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार प्रांत कार्यालयाच्या समोरून रस्त्याने बसस्थानक मार्गावर आली असता पाठलाग करीत असलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले. यावेळी वाद सुरू झाला.

दरम्यान, ही बाब वाहतूक पोलिसांना समजताच वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीस्वारांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूच्या पर्यटकांना पोलीस ठाणे परिसरात आणले. तेथे फ्री स्टाईल झटापटही झाली. दरम्यान, कार चालकाने त्यांना योग्य ती समज द्या. ते शिक्षण घेत असल्यास त्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अडचण येऊ नये, असे सांगून आपली तक्रार नसल्याचे सांगितले.

पोलिसालाही दुखापत

पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला असता एका पोलिसाचा हात दुखावला, तर दुसऱ्या पोलिसाचा चष्मा तुटला. पोलिसांनी तत्काळ गोवा येथील पर्यटकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हेही वाचा