डिंपल रेवणकर-तनिष्काची मुख्य फेरीत मजल

अखिल भारतीय बॅडमिंटन मानांकन स्पर्धा : वंश, शौर्य, आर्य, अनया यांचा पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
19th June, 12:43 am
डिंपल रेवणकर-तनिष्काची मुख्य फेरीत मजल

पणजी : पेडे येथील मल्टिपर्पज स्टेडियममध्ये सुरू असलेल्या योनेक्स-सनराईज अखिल भारतीय सब-ज्युनियर (१५ आणि १७ वर्षांखालील) मानांकन बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये गोव्यातील युवा बॅडमिंटनपटूंनी पात्रता फेरीच्या अंतिम दिवशी दमदार कामगिरी केली.
१५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात गोव्याच्या डिंपल रेवणकर हिने तेलंगणाच्या तनिष्का गंजी हिच्याबरोबर जोडी जमवून महाराष्ट्राच्या आराध्या धरे आणि सई जोशी या जोडीला १६-१४, १५-१२ असे पराभूत करत मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळवला.
दरम्यान, गोव्याच्या वंश खेडकर याने १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात तेलंगणाच्या तनिष रेड्डी बुडिदा याच्याविरुद्ध चुरशीची लढत दिली. मात्र त्याला १५-१३, १४-१६, १५-१० अशा लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. याच स्पर्धेत वंश आणि शौर्य नाईक यांनी मुलांच्या दुहेरीत तामिळनाडूच्या दर्शनकुमार एस.व्ही. आणि दानिश सुलतान या जोडीविरुद्ध संघर्ष केला, मात्र त्यांना १९-१७, १५-५ असा पराभव स्वीकारावा लागला.
१५ वर्षांखालील गटात मुलींच्या दुहेरीत गोव्याच्या अनया कामत आणि आर्या मेत्री यांनी उत्कृष्ट खेळ केला, मात्र तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित निहारिका ए. आणि विदर्शना टी. या जोडीविरुद्ध त्यांना १५-७, १६-१० असा पराभव पत्करावा लागला.
मानांकित खेळाडूंचे अपेक्षेप्रमाणे विजय
पात्रता फेरीत मानांकित खेळाडूंनी आपला दर्जा सिद्ध केला. १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत दुसऱ्या मानांकित मेहविश कौर (पीएनबी) हिने मध्य प्रदेशच्या अविका वर्माला १५-७, १५-९ असे पराभूत केले. पाचव्या मानांकित निमिषा ओझा (ओडिशा) हिने पहिला गेम ३-१५ असा गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत केरळच्या श्रेया मारिया मॅथ्यू हिच्यावर ३-१५, १५-१२, १५-९ असा विजय मिळवला. सहाव्या मानांकित आर्शिया (गुजरात) आणि नवव्या मानांकित भावना चाहल (हरयाणा) यांनी देखील आपापले सामने जिंकले.
१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत मात्र मोठा उलटफेर झाला. महाराष्ट्राच्या आर्चित व्यास याने दुसऱ्या मानांकित पार्थ गावरी (हरयाणा) याला १५-११, १५-१३ असे हरवत स्पर्धेतील मोठा धक्का दिला. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या अभिनव पंघाल याने चौथ्या मानांकित शिवचरण गणेशन (तामिळनाडू) याला १६-१४, १६-१८, १५-७ अशा तीन गेम्समध्ये पराभूत करत आणखी एक अनपेक्षित निकाल नोंदवला. १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत टॉप सीड शांतीप्रिया हजारिका (आसाम) हिने गुजरातच्या आरल पटेल हिचा १५-५, १५-९ असा सरळ गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.