नव्या नेतृत्वाला संधी, सोशल मीडियावर भर, जनसंपर्क आणि संघटन बांधणी यावर भर देत राहुल गांधी पुढे सरसावले तरच काँग्रेस पक्ष देशातील लंगडा घोडा ठरणार नाही, असे त्यांच्या लक्षात आणून देणे पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
लो कसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी देशात सुपरिचित आहेत. त्यांची निवेदने अनेक वेळा चेष्टेचा विषय ठरतात. त्यांच्या सल्लागारांविषयी संशय व्यक्त केला जातो. त्यांचा उल्लेख असंख्य जण पप्पू या नावानेच करतात. त्यांच्या यात्रांची खिल्ली उडवली जाते. आता काय ५५ व्या वर्षी परिपक्वता येणार आहे, असे विचारले जाते. अर्थात जनतेमधील प्रतिमा अशी असली तरी त्यांची विचारांची दिशा ठरली आहे, असे अलीकडे दिसू लागले आहे. लोकसभेत ९९ जागापर्यंत मजल मारल्यानंतर आपण २०२९ मध्ये नक्कीच ही संख्या दुप्पट करू असा विश्वास पक्षात आणि काँग्रेस पक्षात निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवतो आहे. पाकिस्तानधार्जिणे, देशद्रोही, परदेशात टीकात्मक वक्तव्ये करणारा नेता अशी काही विशेषणे त्यांना लावली जातात आणि ती जनतेला पटतात. त्यामुळे भाजपने काँग्रेसमुक्त भारत असा नारा देत देशातील एकेका राज्यात आपली सत्ता स्थापन केली आहे. खरोखरच राहुल गांधी यांची वाटचाल पक्षाला खड्ड्यात घेऊन जाणारी आहे की पक्षाला उभारी देणारी आहे, याचा निपक्षपातीपणे विचार केल्यास जे चित्र समोर येते, ते काँग्रेससाठी आशादायक नाही. राहुल गांधी यांचे अगदी अलिकडचे वक्तव्य पाहा. मध्य प्रदेशात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, की घोडे तीन प्रकारचे असतात. (लग्नाच्या) वरातीतील घोडे, रेससाठी धावणारे घोडे आणि तिसरा प्रकार म्हणजे लंगडे घोडे. सध्या रेसमधील घोडे वरातीत, तर वरातीतील घोडे रेसमध्ये धावतात आणि खरे सांगायचे तर लंगड्या घोड्यांना विश्रांती देण्याची वेळ आली आहे. या एकाच निवेदनाने त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नेते जसे अस्वस्थ झाले, तसे सत्ताधारी एनडीएमध्येही हे आपल्याला उद्देशून तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय राजकारणात अनेक हालचाली आणि नव्या घडामोडी घडत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी नुकत्याच एका भाषणात बोलताना लंगडे घोडे असा उल्लेख केला. या वक्तव्यातील ‘लंगडे घोडे’ कोण आहेत, याचा राजकीय अर्थ लावणे महत्त्वाचे ठरते. राहुल गांधींच्या वक्तव्यानुसार, हे शब्द त्यांनी एनडीएतील काही पक्षांसाठी वापरले आहेत. विशेषतः तेलुगू देशम पक्ष, जनता दल (युनायटेड), शिवसेना शिंदे गट यांना उद्देशून ते बोलले असावेत, असा समज काँग्रेस नेत्यांनी करून घेतला आहे. हे तिन्ही पक्ष सध्या भाजपप्रणीत एनडीएमध्ये असून, मोदी सरकारला बहुमत गाठण्यासाठी ते निर्णायक ठरले. राहुल गांधींचा दावा असा आहे की, हे पक्ष भाजपच्या तालावर नाचत असून, त्यांना जनतेचा स्पष्ट पाठिंबा नाही त्यामुळे त्यांनी लंगडे घोडे अशी उपमा वापरली. म्हणजेच, स्वतःहून स्वयंपूर्ण नसलेले, दुसऱ्याच्या आधारावरच राजकारणात टिकलेले पक्ष किंवा नेते हेच लंगडे घोडे. राहुल गांधी हे विधान करून काही मुद्दे अधोरेखित करू इच्छित असावेत. भाजपची सत्ता आता कमकुवत आहे, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या आधाराशिवाय सत्ता मिळणे अशक्य झाले आहे. मित्रपक्षांचा कमकुवतपणा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तेलगू देसम, जनता दल (यू) हे भाजपशी तडजोड करून सत्ता मिळवत आहेत, पण त्यांनी जनतेचे समर्थन हरवले आहे, हा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे.
राहुल गांधी हे दर्शवू इच्छित आहेत की, इंडि आघाडीचा संघर्ष हा लोकशाहीच्या मूल्यांसाठी असून, भाजपची सत्तेची घोडदौड केवळ "सत्ता राखण्यासाठी" आहे. राहुल गांधी या वक्तव्यातून विरोधी पक्षांची (भाजपसह एनडीए) अस्थिरता, सत्तेची लालसा आणि जनतेपासून तुटलेपणा अधोरेखित करतात. या वक्तव्यावर टीका देखील झाली. काही राजकीय विश्लेषकांनी वाटते की, हे विधान संबंधित पक्षांना अपमानास्पद वाटू शकते आणि मित्रपक्षांना दुखवणारे आहे. जर इंडि आघाडीला सरकार स्थापनेची कधीकाळी संधी मिळाली, तर तेलगू देसम, जनता दल (यू) सारखे पक्ष निर्णायक ठरू शकतात. अशावेळी अशा वक्तव्यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता असते. खरे पाहता, लंगडे घोडे हे वक्तव्य हे राहुल गांधींच्या राजकीय आक्रमकतेचे निदर्शक आहे. ते विरोधी पक्षांची मर्यादा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा वक्तव्यांमुळे सत्तासंघर्ष अधिक धारदार होतो आणि मैत्रीपेक्षा संघर्ष अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण होते.
राहुल गांधींचे लंगडे घोडे हे वक्तव्य आपल्या पक्षातील नेत्यांसाठी होते का, असाही प्रश्न उपस्थित होतो. हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे हे शब्द फक्त विरोधकांसाठी वापरले, की काँग्रेसमधील काही जुने, अनुभवसंपन्न पण प्रभाव गमावलेले नेते म्हणजेच पक्षातील जुन्या चेहऱ्यांसाठी वापरले? राहुल गांधी यांनी भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता ‘लंगड्या घोड्यां’च्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. हे वक्तव्य भाजपच्या मित्रपक्षांबाबत होते. मात्र, याचवेळी काही वाक्यांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातील जुन्या पद्धतीचे, निष्क्रिय आणि केवळ पदासाठी चिकटलेले नेतेही अप्रत्यक्षपणे टीकेचा विषय केले. राहुल गांधी आणि त्यांच्या जवळच्यांची विचारधारा अधिक आक्रमक आणि नव्या पिढीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आहे, असे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला किंवा नाराजी व्यक्त केली असल्याचे दिसून आले आहे. राहुल गांधी यांनी वेळोवेळी सांगितले की, पक्षात नवीन ऊर्जा आणि लोकशाही पुनर्रचना आवश्यक आहे. त्यामुळे जुन्या वयस्कर आणि निष्क्रिय गटाला त्यांनी लंगडे घोडे संबोधले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या पिढीचे नेते के. सी. वेणुगोपाल, सचिन पायलट हे राहुल गांधींच्या विचारसरणीशी सहमत असून, पक्षात बदलांची गरज मान्य करतात. मात्र, जुने नेते असा विचार करतात की पक्षाची सध्याची वाटचाल अनुभव आणि समन्वयाऐवजी भावनांवर चालते आहे. काही जणांनी राहुल यांच्या एकहाती निर्णय घेण्याच्या शैलीबाबतही आक्षेप घेतले आहेत. नव्या नेतृत्वाला संधी, सोशल मीडियावर भर, जनसंपर्क आणि संघटन बांधणी यावर भर देत राहुल गांधी पुढे सरसावले तरच काँग्रेस पक्ष देशातील लंगडा घोडा ठरणार नाही, असे त्यांच्या लक्षात आणून देणे काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने
महत्त्वाचे आहे.
- गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४