सिरसई धबधब्याकडे जाणारा रस्ता पंचायतीकडून बंद

कॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतर प्रतिबंधात्मक उपाय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th June, 11:50 pm
सिरसई धबधब्याकडे जाणारा रस्ता पंचायतीकडून बंद

म्हापसा : सिरसई येथील पठारावरील कोंशीर झरा आणि धबधब्याकडे जाणारा रस्ता पंचायतीने कोलवाळ पोलिसांसह बंद केला आहे. गेल्या रविवारी एका पोलीस कॉन्स्टेबलचा खंदकातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भेट देणाऱ्या लोकांच्या हालचालींवर अंकुश घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे पाऊल पंचायतीने उचलले आहे.

सरपंच सिमरन उसकईकर म्हणाल्या की, धबधब्याकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार करावा व जीवाचा धोका पत्करू नये. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी खंत व्यक्त केली.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही दरवर्षी पोलिसांना पत्र लिहून या भागात गस्त घालण्याची विनंती करतो. तरुण वर्ग धबधब्याकडे आकर्षित होतो. येथे येण्यासाठी ते गुगल मॅप्सचा वापर करतात. पंचायतीने घटनास्थळाची संयुक्त पाहणी केली व जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपसरपंच रुपेश मडगावकर म्हणाले की, अशा घटना टाळण्यासाठी आम्ही पंचायतीच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करतो. आम्ही दरवर्षी धबधब्याकडे जाणारा रस्ता बंद करतो, परंतु लोक झरा किंवा धबधब्याकडे जाण्यासाठी इतर मार्गांचा वापर करतात.

पंचायत दरवर्षी पोलिसांना या भागात, विशेषत: शनिवारी व रविवारी गस्त घालण्यासाठी पत्र लिहिते. त्यानुसार, पोलीस गस्त घालतात. गेल्या आठवड्यात पोलिसांनी गैरप्रकार करणाऱ्या तरुणांवर दंडात्मक कारवाई केली होती. ज्याठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल बुडाला तो खंदक नव्हे तर खासगी मालमत्तेत बांधलेली विहीर होती, असे ते म्हणाले.

कॉन्स्टेबलचा मृत्यू खासगी मालमत्तेतील विहिरीत!

पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूची घटना ही झऱ्याजवळ नव्हे, तर खासगी मालमत्तेत असलेल्या विहिरीत घडली आहे. सदर विहिरी सभोवती बॅरिकेड्स घालण्यात यावे. तसेच धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता व्यवस्थित नसल्याने प्रशासनाने लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

हेही वाचा