तिसवाडी : बनावट सोने तारण ठेऊन फायनान्स कंपनीला घातला १६.५० लाखांचा गंडा!

जुने गोवे पोलिसांनी केला तिघांविरोधात गुन्हा दाखल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th June, 10:47 am
तिसवाडी : बनावट सोने तारण ठेऊन फायनान्स कंपनीला घातला १६.५० लाखांचा गंडा!

पणजी : सांताक्रूझ येथील मुथूट फायनान्स (MUTHOOT FINANCE ) शाखेत बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून तब्बल १६ लाख ४९ हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जुने गोवे पोलीस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाआहे. सदर कारवाई ही मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाच्या (JMFC) आदेशावरून करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

मुथूट फायनान्सच्या सांताक्रूझ (SANTA CRUZ) शाखेचे क्लस्टर मॅनेजर भिकेश गंपू कोनाडकर (वय २८, रा. धारगळ, पेडणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० मार्च २०२४ ते ६ मे २०२४ या कालावधीत तिघा संशयितांनी शाखेत जाऊन खोटे सोने तारण ठेऊन  अनेक कर्जे घेतली. कर्जासाठी गहाण ठेवलेले दागिने हे बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे संस्थेची तब्बल १६.५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

तक्रारीच्या आधारे भीमप्पा यल्लप्पा चालवाडी (रा. एमपीटी कॉलनी, हेडलँड सडा), नौशाद शेख (रा. डेस्ट्रो वाडा, वास्को) आणि संतोष चंद्रप्पा बिंगी (रा. एमपीटी हॉस्पिटलजवळ, सडा) या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) च्या कलम २३६, २३७, ३१८(४) व ३(५) नुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या तिघांनी एकत्रित कट रचून फसवणुकीचा प्रकार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास जुने गोवे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रतीक भटप्रभू हे करीत असून, अधिक तपशील पुढे येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा