विशेष संपादकीय
प्रसारमाध्यमांमध्ये वेगाने बदल होतानाच डिजिटलच्या काळात अनेक आव्हानेही उभी राहिलेली आहेत. शेवटी खऱ्याची कास धरली की सगळ्या स्पर्धा सोप्या होतात. ‘गोवन वार्ता’ने खऱ्या बातम्या देताना सर्वांत आधीच्या नादात काही खोटे येणार नाही, याची काळजी घेतली. वेगवान पद्धतीने बातम्या देण्यासाठी सतत प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच खऱ्या, एक्सक्ल्युझिव्ह बातम्या देण्याच्या बाबतीत ‘गोवन वार्ता’ नेहमी अग्रेसर राहिला. पेपरसोबतच चोवीस तास जागल्याची भूमिका घेऊन डिजिटलच्या सर्व माध्यमांतून बातम्या दिल्या. त्यामुळेच गोव्यातील मराठी वर्तमानपत्रांमध्ये ‘गोवन वार्ता’ फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आघाडीवर आहे. वेबसाईटचे वार्षिक आकडे पाहिले, तर गोव्यातील क्षणाक्षणाच्या बातम्या देण्याच्या धडाडीमुळे ‘गोवन वार्ता’च्या वेबसाईटला २.४ कोटी व्ह्यूज आहेत. नवे वापरकर्ते २१.४ लाख आहेत. हे आकडे म्हणजे वाचकांनी दिलेली पोचपावती आहे. वाचकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे गोव्यातील बित्तंबातमी वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देताना ‘गोवन वार्ता’लाही आनंद होतो.
डिजिटलची जोड आणि विश्वासार्हतेची हमी अशा दोन्ही गोष्टींना प्राधान्य देऊन निष्ठेने पत्रकारिता करण्याचे कार्य ‘गोवन वार्ता’कडून घडत आहे, ते वाचकांमुळेच. त्यातूनच हा दहा वर्षांचा यशस्वी प्रवास झाला आहे. यापुढेही वाचकांची कधी निराशा होणार नाही, अशी हमी याक्षणी द्यावीशी वाटते.
वाचनसंस्कृतीच्या बदलत्या काळात आणि झपाट्याने बदलणाऱ्या माहितीच्या प्रवाहात ‘गोवन वार्ता’ हे वर्तमानपत्र फक्त टिकून राहिले नाही, तर दहा वर्षांचा विश्वासार्हतेचा टप्पा गाठून पुढचा प्रवास सुरू केला आहे. या दशकभराच्या प्रवासात अनेक बदल केले. प्रिंट आणि डिजिटलचा समांतर प्रवास सुरू केला. ‘गोवन वार्ता’च्या पावलावर पाऊल ठेवून तशाच प्रकारचे बदल करण्यासाठी बाहेर अनेकांची धडपड सुरू असतानाही ‘गोवन वार्ता’ने नेहमी वाचकांची पसंती ओळखून तशा प्रकारचा वाचनीय मजकूर दिला. हे करताना पत्रकारितेच्या मूल्यांना महत्त्व देत, हे वर्तमानपत्र आज अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे.
२०१५ साली सुरू झालेल्या ‘गोवन वार्ता’ची कहाणी केवळ बातम्यांची नाही; ही कहाणी आहे लोकांच्या जगण्यातल्या प्रश्नांना वाचा फोडण्याची. ‘गोवन वार्ता’ने गोव्यातील तळागाळातील प्रश्न मांडले जातील, याची नेहमी काळजी घेतली. त्याचे श्रेय ‘गोवन वार्ता’च्या राज्यभर असलेल्या पत्रकारांच्या टीमला जाते. छापील अंकाच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास डिजिटल माध्यमांशी हातमिळवणी करून निरंतर सुरू आहे. एखादी बातमी खरी आहे का, हे जाणून घेण्यासाठी ‘गोवन वार्ता’च्या अपडेटचीच वाट पाहिली जाते, हे ‘गोवन वार्ता’चे श्रेय आहे. झपाट्याने बदलत असलेल्या प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत वाचकांच्या हातातील मोबाईल स्क्रीनपर्यंत पोहोचताना, आमचा निष्ठेने बातमीदारी करण्याचा उद्देश कधीच बदलला नाही. विश्वासार्ह माहिती, निर्भीड पत्रकारिता आणि वाचकांच्या हिताचे विषय सतत मांडणे हेच, आमचे ध्येय राहिले.
या दहा वर्षांत आम्ही फक्त बातम्या दिल्या नाहीत, तर वाचकांचा विश्वासही कमावला. स्थानिक प्रश्नांपासून ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत, आम्ही कायम जनतेच्या बाजूने राहिलो. निवडणुका असो किंवा कुठलीही घटना. वस्तुनिष्ठ विश्लेषण दिले. ‘दिवाळी अंक‘ असो किंवा ‘हुप्पा हुय्या’ हा गोव्यातील एकमेव बालअंक असो. शनिवारची ‘ती’ पुरवणी असो किंवा रविवारचा ‘तरंग’ असो. आम्ही मुलांपासून घरातील जाणत्या वाचकांनाच केंद्रस्थानी ठेवले. दहा वर्षांचा टप्पा पार करताना आम्ही आतापर्यंत ज्या जबाबदारीने पत्रकारिता केली, त्याच पद्धतीने पुढेही डिजिटलच्या साथीने वाचकांना कायम सर्वांत आधी बातम्या देत राहू. ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, मल्टीमीडिया रिपोर्टिंग तसेच वाचकांच्या आवडीचे विषय आणि पुरवण्या हाताळताना अनेक नवकल्पनांच्या माध्यमातून आम्ही पुढचे दशक गाठण्यास सज्ज आहोत. या प्रवासात आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, प्रेम करणाऱ्या आणि योग्य वेळेस टीका करणाऱ्याही सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या विश्वासामुळेच आम्ही ‘वर्तमान’ आहोत आणि ‘भविष्य’ घडवू शकतो.