गोव्याच्या अनाया कामतची चमकदार कामगिरी सुरूच

अदिती, देवांशाची आगेकूच : गोव्यातील शटलर्ससाठी संमिश्र दिवस, आघाडीच्या खेळाडूंचा पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th June, 12:03 am
गोव्याच्या अनाया कामतची चमकदार कामगिरी सुरूच

पणजी : पेडे येथे सुरू असलेल्या योनेक्स-सनराईज अखिल भारतीय सब ज्युनियर (१५ आणि १७ वर्षांकालील) रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये गोव्याच्या बॅडमिंटनपटूंसाठी मंगळवारचा दिवस संमिश्र ठरला. अनाया कामतने आपल्या चमकदार कामगिरीने स्थानिक गटात उत्साह भरला, तर काही खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला.

अनाया कामतने मुलींच्या १५ वर्षांखालील गटातील दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या उर्वी हुरकडलीवर १५-५, १५-७ अशा एकतर्फी विजयाची नोंद केली. अदिती धारगळकरला कर्नाटकच्या अवनी मूर्तीविरुद्ध वॉकओव्हर मिळाल्याने ती पुढच्या फेरीत दाखल झाली. मुलांच्या १७ वर्षांखालील दुहेरी गटात गोव्याच्या देवांशा सकपालने महाराष्ट्राच्या ईशान लागुसोबत जोडी जमवत १५-६, १५-७ असा विजय मिळवला.  शेन डिसोझा आणि कार्तिकेन एन. या गोव्याच्या जोडीलाही वॉकओव्हर मिळाल्याने ते पुढील फेरीत पोहोचले.

मिश्र दुहेरी १७ वर्षांखालील गटात गोव्याची याशिला चेल्लुरीने आंध्र प्रदेशच्या विनयकासोबत उत्कृष्ट ताळमेळ साधत तेलंगणाच्या रोहन पब्बिसेट्टी आणि धृती बंदा यांचा १२-१५, १५-१२, १५-१३ असा पराभव केला.

उत्कृष्ट प्रयत्न करूनही गोव्याच्या बॅडमिंटनपटूंना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मुलींच्या १५ वर्षांखालील गटात निहारिका परवार, कणिका पै वर्णेकर, प्रज्ञा ऑडी, आस्था पुडेल आणि पलक रामनाथकर यांना पराभव पत्करावा लागला. मुलांच्या १५ वर्षांखालील दुहेरी गटात, संकेत खानोलकर-सिद्धेश कोटकर, प्रजेश गावस-आनाव कोलवालकर आणि सॅम्युअल गोन्साल्व्हिस-नील बक्षी या सर्व जोड्यांना प्रतिस्पर्ध्यांवर मात करता आली नाही. 

राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची कामगिरी

- राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे चमकदार कामगिरी केली. मात्र, मुलींच्या १५ वर्षांखाली गटात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला, जिथे टॉप सीडेड अभिषा श्री सरवनन (तामिळनाडू) हिला केरळच्या इशानवी सी.बी.ने रोमांचक तीन गेमच्या सामन्यात पराभूत केले.
- दुसरी सीडेड मेहविश कौर (पीएनबी) ने १५-३, १५-३ असा सहज विजय मिळवला, तर ५वी सीडेड निमीषा ओझा (ओडिशा) आणि ६वी सीडेड आरशिया (गुजरात) यांनीही सहज विजय नोंदवले. 
- मुलांच्या १७ वर्षांखालील गटात, अवधूत कदम (महाराष्ट्र), पार्थ गाव्री (हरियाणा), शिवाचरण गणेशान (तामिळनाडू) आणि पार्थ पुरी (गुजरात) हे टॉप चार सीडेड खेळाडू पुढील फेरीत पोहोचले. यात गाव्रीने पश्चिम बंगालच्या सायक सहाविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. 
- कैवल्य सूद (पीएनबी), श्री हर्षा मार्का (तेलंगणा) आणि इतर दावेदार खेळाडूही पुढील फेरीत पोहोचले, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा तीव्र बनली आहे.