जय शहा यांचे समर्थन : डब्ल्यूटीसी २०२७-२९ मध्ये होणार बदल
लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मुळे कसोटी क्रिकेटला पुन्हा मिळालेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) २०२७-२९ च्या डब्ल्यूटीसी स्पर्धेत काही मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. लहान देशांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता देण्याचा विचार सुरू असून, यामुळे कसोटी क्रिकेटचा प्रसार वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मोठ्या संघांना या नियमातून वगळण्यात येणार आहे, असे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी नुकतेच स्पष्ट केले.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात लॉर्ड्स येथे झालेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यादरम्यान आयसीसी अध्यक्ष जय शहा यांनी २०२७-२९ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चार दिवसांच्या कसोटी सामन्यांचे समर्थन केले. शहा यांनी स्पष्ट केले की, वेळ आणि खर्चामुळे अनेक लहान देश कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास टाळाटाळ करतात. चार दिवसांच्या क्रिकेटकडे वाटचाल केल्याने संपूर्ण तीन कसोटी मालिका तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळात खेळता येतील. यासाठी नवीन नियम बनवता येतील, असेही त्यांनी सांगितले.
चार दिवसांच्या कसोटीचा इतिहास आणि नवा प्रस्ताव
२०१७ मध्ये आयसीसीने पहिल्यांदा द्विपक्षीय सामन्यांसाठी चार दिवसांच्या कसोटीला मान्यता दिली होती. २०१९ आणि २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध चार दिवसांच्या कसोटीनंतर इंग्लंडने गेल्या महिन्यात ट्रेंट ब्रिज येथे झिम्बाब्वेसोबत चार दिवसांचा सामना खेळला होता.
चार दिवसांच्या कसोटी सामन्यांमुळे एक दिवस कमी होईल. तसेच वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी एका दिवसातील खेळण्याचा वेळ दररोज किमान ९८ षटके टाकण्यात यावीत, असाही नियम करण्याचा विचार सुरू आहे. सध्याच्या पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात एका दिवसात जास्तीत जास्त ९० षटके टाकली जातात.
भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी अपवाद
जय शहा यांनी स्पष्ट केले की, भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना अजूनही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, अॅशेस आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी पाच दिवसांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची परवानगी असेल. दरम्यान, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणार आहे.
२०२५-२७ डब्ल्यूटीसी चक्र असेल पाच दिवसांचे
२०२५-२७ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मात्र, पाच दिवसांच्या सामन्यांच्या सध्याच्या स्वरूपानुसार सुरू राहील. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने त्याची सुरुवात होईल. २०२५-२७ या चक्रात सहभागी होणाऱ्या नऊ देशांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या २७ कसोटी मालिकांपैकी १७ मालिका या फक्त दोन सामन्यांच्या असतील, तर सहा मालिका तीन सामन्यांची असेल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे सर्व एकमेकांविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळतील.