गोव्याच्या अनया कामतची तिसऱ्या दिवशी चमकदार कामगिरी

ऑल इंडिया सब ज्युनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
16th June, 11:55 pm
गोव्याच्या अनया कामतची तिसऱ्या दिवशी चमकदार कामगिरी

पणजी : योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सब-ज्युनियर (१५ व १७ वर्षांखालील) रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२५’ मध्ये गोव्याची उदयोन्मुख खेळाडू अनया कामत हिने आपला दबदबा दाखवत कर्नाटकच्या उर्वी हुरकडली हिच्यावर १५-५, १५-७ अशी सरळ गेम्समध्ये मात करत मुलींच्या १५ वर्षाखालील गटात दुसऱ्या फेरीत विजय मिळवला.
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात अदिती धारगळकर हिला कर्नाटकच्या अवनी मूर्तीविरुद्ध वॉकओव्हर मिळाल्यामुळे पुढील फेरीत प्रवेश मिळाला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात (दुहेरी) गोव्याच्या देवांश सकपाळ याने महाराष्ट्राच्या ईशान लागूसोबत जोडी करत १५-६, १५-७ असा विजय मिळवला. गोव्याचे शेन डिसोझा व कार्तिकेयन एन. या जोडीलाही वॉकओव्हर मिळाला.
मिश्र डबल्स १७ वर्षांखालील गटात गोव्याच्या यशिला रतिका चेल्लुरी हिने आंध्र प्रदेशच्या विनायक मणी बाबू मच्छा चरन श्री मणिसोबत जोडी करत, तेलंगणाच्या रोहन पब्बीशेट्टी आणि धृती सहस्र बंदा यांना १२-१५, १५-१२, १५-१३ अशा चुरशीच्या तीन गेम्समध्ये पराभूत केले. ही लढत अत्यंत उत्कंठावर्धक ठरली.
मुलींच्या १५ वर्षांखालील गटात गोव्याच्या निहारिका परवार, कनिका पै वेर्णेकर, प्रग्या आषडी, आस्था पडेल, पलक रामनाथकर या खेळाडूंना सरळ गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला.
१५ वर्षांखालील दुहेरीत गोव्याच्या संकत खानोलकर-सिद्धेश कोटकर, प्रजेश गावस-अणव कोलवळकर, सॅम्युएल गोन्साल्व्हिस-नील पंजानी बक्षी या जोड्यांना आपल्या मानांकित प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
१७ वर्षांखालील गटात गोव्याचे ओविस तहसीलदार आणि देवांश सकपाळ यांनी तिसऱ्या फेरीत कडवी झुंज दिली, पण तीव्र संघर्षानंतर तीन गेम्समध्ये पराभूत झाले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांची कामगिरी :
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात केरळच्या ईशान्वी सी. बी. हिने टॉप सीड अभिशा श्री सरवनन (तमिळनाडू) हिला तीन गेम्समध्ये पराभूत केले. दुसरी मानांकित मेहविश कौर (पंजाब नॅशनल बँक) हिने १५-३, १५-३ असा सरळ विजय मिळवला. पाचवी मानांकित निमेशा ओझा (ओडिशा) आणि सहावी आरशिया (गुजरात) या दोघींनीही सहज विजय नोंदवले.
१७ वर्षाखालील मुलांच्या गटात अवधूत कदम (महाराष्ट्र), पार्थ गावरी (हरियाणा), शिवचरण गणेशन (तमिळनाडू), पार्थ पुरी (गुजरात) हे चारही टॉप सीड खेळाडू पुढील फेरीत पोहचले.
यामध्ये पार्थ गावरी याने पश्चिम बंगालच्या सायक साहाविरुद्ध थरारक लढत जिंकली.
तसेच कैवल्य सूद (पीएनबी), श्री हर्षा मारका (तेलंगणा) यांनीही आपले सामने जिंकले.