सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र, गेल्या काही काळात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटात काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिवमोग्गा : ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पुन्हा एक मोठा अपघात घडला आहे. काल शनिवारी १४ जून रात्री कर्नाटकातील मणि जलाशयात चित्रीकरण सुरू असताना, ऋषभ शेट्टी आणि त्यांची टीम वापरत असलेली बोट अचानक पाण्यात उलटली. बोटीत अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीसह ३० पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञ होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वजण वेळेवर पोहत सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले.
अंतिम टप्प्यातील चित्रीकरणाचे काम गेल्या १५ दिवसांपासून तिर्थहल्लीजवळील या जलाशयात सुरू होते. अपघाताच्या वेळी बोटीत महागडे कॅमेरे आणि इतर चित्रिकरण साहित्य होते. ते सर्व पाण्यात बुडाल्याने कोट्यववधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे चित्रपटाच्या युनिटमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, कारण याआधीही ‘कांतारा: चॅप्टर १’च्या सेटवर थरकाप उडवणाऱ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. चित्रपटातील सुरुवातीच्या टप्प्यातील शूटिंगदरम्यान केरळमधील एक ज्युनियर कलाकार पोहताना बुडाला, नंतर प्रसिद्ध कन्नड विनोदी कलाकार राकेश पुजारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वी केरळचे आणखी एक कलाकार विजू व्ही.के. यांचेही निधन झाले. या सगळ्या घटनांमुळे आधीच चिंता वाढलेली असतानाच, आता ही बोट उलटण्याची घटना घडल्याने चित्रपटाच्या टीममध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
‘कांतारा’च्या प्रचंड यशानंतर ‘कांतारा: चॅप्टर १’ या प्रिक्वेल चित्रपटाची निर्मिती होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका ऋषभ शेट्टी करत असून, हे चित्रीकरण त्यांच्या गावाजवळच सुरू आहे. केरळमधील कलाकारांचाही मोठा सहभाग आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हिएफएक्स आणि अॅक्शन सीन्स तयार करण्यासाठी हॉलिवूडमधील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. हा चित्रपट होम्बाळे फिल्म्सद्वारे तयार केला जात आहे.