लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या
बेळगाव : कामावर जाण्याचा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या लहान भावाने आपल्याच मोठ्या भावाची हत्या केली. यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गुळेद यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, दि. ९ मे रोजी यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाश्चापूर येथील एका शेतातील कालव्याच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. पोलिसांच्या तपासणीत हा मृतदेह मेंढपाळ रायप्पा याचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, मृताच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याचे आढळून आले. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांनी विशेष पथक तयार करून तपास केला असता, हट्टी आलूर गावातील २८ वर्षीय रायप्पा सुरेश कमती याचा लहान भाऊ २४ वर्षीय बसंतराज सुरेश कमती यानेच सुनियोजितपणे त्याची हत्या केल्याचे समोर आले. बसवराज कुवैतमधील एका कंपनीत काम करत होता आणि तो मार्च महिन्यात बेळगावला परतला होता. रायप्पा हा कुटुंबाचा एकमेव आधार होता आणि तोच काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. मोठा भाऊ रायप्पा मेंढरे चारण्यासाठी कालव्यापाशी जात असल्याचे माहीत असल्याने, बसवराजने त्याची हत्या केली. तपास अधिकाऱ्यांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली असून, त्याला न्यायालयात हजर केले आहे.