न्यूयॉर्क : अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यात एका धक्कादायक घटनेत दोन लोकप्रतिनिधी, स्टेट सिनेटर जॉन हॉफमॅन आणि स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह मेलिसा हॉर्टमॅन यांच्या घराजवळ गोळीबार झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी याला ‘नियोजित हल्ला’ असे म्हटले आहे.
या घटनेत जॉन हॉफमॅन जखमी झाले असून, मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोळीबाराची ही घटना मिनियापोलिसच्या उपनगरातील चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्कमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरात घडली.
प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर पोलिसांच्या वेशात आले होते. मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वाल्ज यांनी हा हल्ला राजकीय कारणांमुळे झाल्याचे संकेत दिले आहेत. या घटनेमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.